2nd Prize to Maharashtra in Inter-State Cultural Program Competition at Delhi
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे.
एकूण पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने धनगरी नृत्य या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेशास तर तृतीय क्रमांक झारखंडला मिळाला.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील राजपथावर चित्ररथाचे संचलन होत असते. या संचलनामध्ये विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. यावर्षी महाराष्ट्राची “साडेतीन शक्तिपीठे” या चित्ररथाचे संचलन होणार आहे. चित्ररथ संचलनात सहभागी झालेल्या राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते.
यावर्षीच्या स्पर्धेमध्ये एकूण १५ सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले होते. विविध राज्ये व केंद्र सरकारच्या विभागानी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे या स्पर्धेमध्ये सादरीकरण केले होते. कलाकारांच्या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, यावर्षी या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातील व्हिजनरी परफॉरमिंग आर्ट्स या लोककला समूहाने धनगरी या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण २४ कलाकारांनी भाग घेतल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com