50 children with cancer visited the governor
५० कर्करोगग्रस्त मुलांनी घेतली राज्यपालांची भेट
खेळण्या-बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे दुख:द– राज्यपाल रमेश बैस
टाटा स्मृती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त मुलांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : जे वय खेळण्या-बागडण्याचे आहे, अभ्यास करण्याचे आहे. त्या वयात मुलांना कर्क रोगासाठी उपचार घेताना पाहणे क्लेशदायक आहे. अशा स्थितीत लहान मुलांची व त्यांच्या पालकांची मानसिक स्थिती काय होत असेल याचा अंदाज देखील बांधता येत नाही. मुलांना त्यांचे बालपण मिळत नाही. या पार्श्वभूमीवर कर्क रुग्ण मुलांना तसेच त्यांच्या पालकांना टाटा मेमोरियल सेंटर तसेच अशासकीय संस्थांतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.
टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त मुलांनी शनिवारी दि. 18 आपल्या पालकांसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लहान मुलांच्या राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरियल सेंटर – इम्पॅक्ट फाऊंडेशन व क्रिश फाऊंडेशन या संस्थांनी केले होते.
योग्य व वेळेवर उपचार केल्यास लहान मुले कर्क रोगावर पूर्णपणे मात करू शकतात व त्यानंतर ते चांगले जीवन जगू शकतात असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी मुलांना भेटवस्तूंचे वाटप केले तसेच त्यांना उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी टाटा मेमोरियल सेंटरच्या इम्पॅक्ट फाऊंडेशन व क्रिश फाऊंडेशनला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. राज्यपालांशी भेट झाल्यानंतर मुलांनी राजभवनाला भेट दिली.
यावेळी इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी शालिनी जटिया, क्रिश फाऊंडेशनचे संस्थापक नवीन शेट्टी, वंदना शेट्टी, लहान मुलांचे कर्क रोग तज्ज्ञ डॉ. वेंकट राम मोहन व लहर बच्छावत आदी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com