In Maharashtra, 7 patients of Corona BA 4 and BA 5 sub-type were registered,
महाराष्ट्रात कोरोनाच्या BA ४ आणि BA ५ या उपप्रकाराच्या ७ रुग्णांची नोंद, सर्व रुग्ण गृहविलगीकरणातच कोरोनामुक्त
कोरोनाच्या नव्या उपप्रकारांच्या पार्श्वभूमीवर लसीकरण पूर्ण करुन घेण्याचं राजेश टोपे यांचं आवाहन
मुंबई/जालना : राज्यात कोरोनाच्या BA ४ आणि BA ५ या उपप्रकारचे रुग्ण पहिल्यांदाच आढळून आले आहेत. हे ओमायक्रॉन प्रकारातले उपप्रकार असून यामुळं विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो, असं आंतरराष्ट्रीय पातळीवर आढळून आलेलं आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयानं करण्यात आलेल्या जनुकीय चाचणीत BA ४ या उपप्रकाराचे ४ तर BA ५ या उपप्रकाराचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेनं केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे उपप्रकार आढळले असून फरीदाबादच्या भारतीय जीवशास्त्रीय डेटा सेंटरनं याची पुष्टी केली आहे.
हे सर्व रुग्ण पुणे शहरातले आहेत आणि ४ मे ते १८ मे २०२२ दरम्यान त्यांना कोरोनाचं निदान झालं होतं. यांना कोरोनाची सौम्य लक्षणं होती आणि कुणालाही रुग्णालयात दाखल करावं लागलं नाही. घरगुती विलगीकरणातून सर्व जण कोरोनामुक्त झाले असून आता सर्वांची तब्येत चांगली आहे, असं राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं कळवलं आहे. यातले चौघे ५० हून अधिक वयाचे तर २ जण २० ते ४० या वयोगटातले आहेत.
एका रुग्णाचं वय १० वर्षांपेक्षा कमी आहे. या रुग्णांपैकी दोघांनी दक्षिण आफ्रिका, बेल्जियमला भेट दिली आहे तर तिघांनी केरळ आणि कर्नाटकचा प्रवास केला आहे. लहान मुलगा वगळता सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असून, एकानं वर्धक मात्राही घेतली आहे. राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली.
राज्यात आज ५२९ रुग्ण आढळले, सव्वा ३ शे रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सर्वाधिक ३३० रुग्ण मुंबईत आढळून आले. ठाणे शहरात ३८, नवी मुंबई शहरात ३१, पुणे शहरात ३२ रुग्ण आढळून आले.
कोरोना विषाणूच्या नवनव्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकानं लसीकरण पूर्ण करुन घ्यावं, आणि पूर्ण झालं असेल तर वर्धक मात्राही घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते.
पुण्यात ओमायक्रॉनच्या BA-4 आणि BA-5 या नव्या उपप्रकारांची लागण झालेले सातही रुग्ण संपूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यापैकी बहुतेकांचं लसीकरण झालं होतं, असं त्यांनी सांगितलं. या व्हेरीयंटच्या अनुषंगानं राज्याच्या आरोग्य विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना टोपे यांनी दिल्या आहेत.