‘A large amount of content in Marathi on social media, Inauguration of Second Social Media Conference at Savitribai Phule Pune University
‘सोशल मीडियावर मराठीत मोठ्या प्रमाणावर कंटेंट’
दुसऱ्या सोशल मीडिया संमेलनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्घाटन
पुणे : मराठीमधून आता मोठ्या प्रमाणावर कंटेंट तयार होत असून, हे एक आशादायक चित्र असल्याचे मत मधुरा रेसिपीज या युट्यूब चॅनेलच्या संचालिका मधुरा बाचल यांनी व्यक्त केले. डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात एका दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले.
मधुरा बाचल यांच्या युट्यूब चॅनेलला ६३ लाखांच्या वर फॉलोअर आहेत. त्या म्हणाल्या, “काही दिवसांपूर्वी मला स्वतःला सोशल मीडियावर एकटीच (नोमाड) असल्याचे जाणवायचे. आता मात्र मोठ्या प्रमाणावर मराठीमध्ये कंटेंट तयार होत असून, हे खूप उत्साह आणणारे आणि आशादायक चित्र आहे. त्याचा मराठीला ही खुप फायदा होत आहे.”
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “आम्ही विद्यापीठ म्हणून लाखो विद्यार्थी आणि इतरांनाही जोडलेले आहोत. या संमेलनामुळे सोशल मीडियाबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि जागृती होईल. लोखंडे म्हणाले, “सोशल मीडियाने सगळ्यांना एका पातळीवर आणले आहे. या सगळ्याकडे एका व्यावसायिक दृष्टीने पाहिल्यास एक मोठी संधी आहे. त्यातून भारताला जगभरात पुढे येण्यासाठी मदत होईल.
मंगेश वाघ यांनी प्रास्ताविक केले आणि संमेलनाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, “सोशल मीडियावर वावरणाऱ्या सगळ्यांचे हे संमेलन आहे. सोशल मीडियामुळे माध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण व्यक्त होत आहे. त्या व्यक्त होणाऱ्या प्रत्येकाचे हे संमेलन आहे. जगातल्या १५ कोटी मराठी भाषकांच्या हा उत्सव आहे.” यावेळी सुमन धामणे, सतीश मगर यांचीही भाषणे झाली. मिलिंद कुलकर्णी यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले.
सोशल मीडियाचे प्रॉडक्ट बनू नका
मराठी सोशल मीडिया संमेलनात उदघाटनानंतरच्या पहिल्या सत्रात दैवता चव्हाण-पाटील आणि नितीन वैद्य यांनी ‘समाजमाध्यमाची दिशा आणि दिशांतरे’ या विषयावर मार्गदर्शन केले.
पाटील म्हणाल्या, “सोशल मिडियाचा वापर वाढू लागल्यानंतर त्याच्याशी निगडित संशोधनही वाढत आहे. यामध्ये सोशल मीडियाच्या वापरामुळे वागणुकीतील बदल, कन्झ्युमर रिसर्च, सोशल मीडियाचे व्यसन, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती, राजकीय निवडणूक, सोशल मीडियावरील चळवळी, शिक्षण क्षेत्रात सोशल मीडियाची भूमिका आणि सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा वापर करता येणारे आणि न करता येणारे असे दोन गट यांच्यावर आधारित संशोधन अशा विविध विषयांचा समावेश आहे. या संशोधनातून मानवी वर्तणुकीतील काही महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित झाले आहे.
सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये एकलकोंडेपणा (डी-ह्युमनायझेशन), आत्ममग्न (सेल्फ ऑबसेशन) आणि आपण एखादे सेलिब्रिटी आहोत असे मानून सतत स्वतःच्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले.”
वैद्य म्हणाले,” सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रकार घडत आहे. ‘फेक न्युज’ हा त्याचाच एक भाग आहे. त्यावर कसलेही नियंत्रण नाही. मात्र, यामुळे एका मोठ्या वर्गाला फायदा होत आहे.
आपण सोशल मीडियाचे प्रॉडक्ट्स झाले आहोत. २०१४ पूर्वी सोशल मीडियावर ह्रदयद्रावक घटना, यशस्वी घटना अशा पोस्ट अधिक वाचल्या जात असत, मात्र २०१४ नंतर द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट जास्त वाचल्या जात असून, त्याचा प्रसारही वाढत आहे. त्यातून सामाजिक तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे आपण प्रेमाचे, सकारात्मकतेचे प्रतीक बनायचे आहे की द्वेषाचे हा निर्णय ज्याचा त्याने करायचा आहे. सोशल मीडियाचा वापर करताना आपण त्या माध्यमाचे बळी ठरणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. या सत्राचे सूत्र संचालन स्नेहल दामले यांनी केले.
सोशल मीडियातून सकारात्मक ऊर्जा मिळावी
माझं एक्स्प्रेशन, माझं इम्प्रेशन हा दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सत्राचा विषय होता. या सत्रात स्वामीराज भिसे, दिया ओस्तवाल, जुही देशमुख आणि डॉ. मानसी भट यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. सोशल मीडिया वापरताना काय भूमिका बाळगली जाते, व्यक्त होण्यापलीकडे सोशल मीडिया कसा उपयोगी आहे या विषयावर या चारही सहभागींना आपली भूमिका मांडली.
या सत्रात मुकुल जोशी यांनी सूत्रधार म्हणून काम पाहिले.
हडपसर न्यूज ब्युरो