A library in every village is our aim, emphasis on education in mother tongue
प्रत्येक गावात ग्रंथालय हे आमचे उद्दिष्ट, मातृभाषेतील शिक्षणावर भर
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने उलगडला चंद्रकांत दादांचा वाचन प्रवास..!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत मुक्त संवाद..!!
पुणे : वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापासूनच मला डॉ.रघुनाथ हे वाचनालय सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आणि तेव्हापासून माझ्या प्रवासाने जोर धरला. आजमितीला मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जुन्या पुस्तकांपैकी एकही पुस्तक वाचायचे बाकी ठेवले नाही, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा सर्वांचीच पुस्तके मी वाचत आलो आहे, अजूनही वाचतो असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या वाचन प्रवासाविषयी सांगितले.
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने १५ ऑक्टोबर २०२२ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन देखील चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र आदी यावेळी व्यासीठावर उपस्थित होते. तर व्यवस्थापन, अधिसभा सदस्य देखील उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांनी चंद्रकांतदादा यांना विचारले. या प्रश्नांना त्यांनी उत्स्फूर्त उत्तरे दिली. ते म्हणाले, समाजमाध्यमांमुळे वाचन कमी झाले आहे असे मला वाटत नाही. ज्यांना वाचायला आवडते ते कसेही वेळ काढतातच. अनेक लोकप्रतिनिधी महत्वाचे मुद्दे, संदर्भ हे वाचन करणाऱ्या व्यक्तींकडून समजून घेतात. याबाबत माझ्या पत्नीची चांगली मदत होते.
तर आवडत्या वाचणाऱ्या राजकारण्यांवर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. वाजपेयी यांच्यासाठी प्रचंड वाचन हा शब्दही अपुरा पडेल इतके त्यांचे वाचन होते तर फडणवीस यांचे वाचन हे बारकाईने केलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावात ग्रंथालय हे आमचे उद्दिष्ट
राज्यात १२ हजार गावांमध्ये ग्रंथालये आहेत आणि साधारण २७ हजार ग्रामपंचायती असणारी गावे आहेत. वाड्या धरून ४३ हजार गावे आहेत. ग्रामपंचायत असणाऱ्या प्रत्येक गावात किमान ‘ड’वर्गाचे ग्रंथालय सुरू झाले पाहिजे असे उद्दीष्ट ठेवण्याच्या सूचना ग्रंथालय संचालनालयाला दिल्या आहेत. त्यांना पहिल्या दिवसापासून ‘ड’ वर्गाचे अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात चारही वर्गातील ग्रंथालयांना अनुदान वाढविण्यात आले आहे. तर पुण्यात फिरत्या ग्रंथालयांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.
मातृभाषेतील शिक्षणावर भर
मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पॉलिटेक्निकची परीक्षादेखील मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. इंग्रजीचे थेट भाषांतर करणारे यंत्रदेखील विकसित करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन
कार्यक्रमानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठाच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक महाविद्यालयापर्यंत आणि ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाने कार्यशाळा आयोजित कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com