Ability to create a cultured society in the art tradition of the country – Governor Bhagat Singh Koshyari
देशाच्या कला परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता
– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : देशाला नृत्य, कला आणि संगीताची परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
अंधेरीतील भवन कल्चरल सेंटरमध्ये नृत्य सम्राज्ञी सितारा देवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कला कृती केंद्राद्वारे 28 व्या आचार्य चौबे महाराज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात राज्यपाल बोलत होते. यावेळी कला कृती केंद्राच्या अध्यक्ष जयंती माला मिश्रा, सचिव राजेश मिश्रा आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले , “मी नृत्य, कला आणि संगीत क्षेत्राचा जाणकार नाही. मात्र, आपल्या देशाला साहित्य, नृत्य, कला आणि संगीत परंपरा लाभलेली आहे. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून ईश्वर दर्शन देखील घडू शकते, इतकी शक्ती या कलेत आहे. केवळ मनोरंजन नव्हे तर, आत्मिक समाधानही संगीतातून मिळते. देश-विदेशात जेव्हा अत्याचार, हिंसाचार आणि दहशतवादासारख्या मानवी समाजाला नुकसान पोहचवणाऱ्या घटना वाढतात, तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी नृत्य,संगीत व कला क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरते”.
देशाची संस्कृती जोपासण्यात कला कृती केंद्राचे मोलाचे योगदान आहे. नृत्य सम्राज्ञी सितारा देवी आणि आचार्य चौबे महाराज यांची कला, त्यांचे ज्ञान नव्या पिढीला मिळत राहावे; या माध्यमातून देशाची वैभवशाली नृत्य आणि संगीत कला जगात प्रसिद्ध व्हावी, अशी अपेक्षा देखील राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त करून कलाकारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यपालांच्या हस्ते जयंती माला मिश्रा (कला कृती केंद्र, अध्यक्ष), राजेश मिश्रा (नाट्य कलाकार), ऋषिका मिश्रा (कथ्थक नृत्यांगना), पं. कालिनाथ मिश्रा (तबला), सोमनाथ मिश्रा (गायन), सौरव मिश्रा (कथ्थक डान्सर बनारस), गौरव मिश्रा (कथ्थक नर्तक बनारस), हिरोको सारा फुकुडा (जयंती माला मिश्राची कथ्थक नृत्यांगना जपानची विद्यार्थिनी), अपर्णा देवधर (सतार), संदीप मिश्रा (सारंगी), कुणाल पाटील (पखावाज), बालकिशन मिश्रा (अभिनेता), रवीकिशन मिश्रा (कथ्थक नर्तक), गुरु श्रीमती केतकी तांबे, दिलीप तांबे(नृत्य निकुंज संस्था), डॉ. वैदेही रेले लाल (नालंदा नृत्य कला महाविद्यालय) या कलाकरांचा सत्कार करण्यात आला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com