Accuracy is more important than speed in news broadcasting and newsmen should keep this in mind
बातम्यांच्या प्रसारणात वेगापेक्षा अचूकता महत्त्वाची असून बातमी देणाऱ्याने प्राधान्याने हे लक्षात ठेवायला हवे
– केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
लोकांचा विश्वास कायम राखणे हे जबाबदार माध्यम संस्थांसाठी सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असायला हवे :अनुराग ठाकूर
नवी दिल्ली : “विश्वसनीय बातमी सादर करणे ही माध्यमांची मुख्य जबाबदारी असून बातम्यांच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती सार्वजनिकरित्या प्रसारित करण्यापूर्वी वस्तुस्थिती योग्यरित्या तपासली पाहिजे”, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सांगितले.
आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनची (अबू) सर्वसाधारण सभा 2022 च्या उद्घाटन समारंभात अनुराग ठाकूर बोलत होते. “बातमी ज्या वेगाने प्रसारित केली जाते ते महत्त्वाचे आहेच मात्र ती प्रसारित करताना अचूकता अधिक महत्वाची आहे आणि बातमी देणाऱ्याने हे प्राधान्याने लक्षात ठेवायला हवे” असे त्यांनी सांगितले.
आकाशवाणी आणि दूरदर्शननं नेहमीच सत्याच्या बाजूनं उभं राहत लोकांचा विश्वास संपादन केला आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे
समाजमाध्यमांच्या विस्तारामुळे , खोट्या बातम्याही प्रसारित होत आहेत असे सांगत यादृष्टीने असत्यापित दावे खोडून काढत लोकांसमोर सत्य मांडण्यासाठी सरकारने तत्परतेने भारत सरकारच्या पत्रसूचना कार्यालयामध्ये फॅक्ट चेक कक्षाची स्थापना केली, अशी माहिती मंत्र्यांनी आशिया-प्रशांत प्रदेशातील प्रसारकांच्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना दिली.
अशा प्रकारच्या आव्हानांवर मात करण्यासाठी तसंच जागतिक प्रसारणातला रस वाढवण्यासाठी भारतीय प्रसारमाध्यमांना बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याची आणि त्यापासून शिकण्याची संधी अबूसारख्या (आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन) कार्यक्रमांमुळे मिळते, असं ते म्हणाले.
एबीयू (आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन) सदस्यांसोबत असलेले भारताचे सहकार्य आणि भागीदारी यावरही त्यांनी चर्चा केली.
प्रसारण उद्योगाच्या विविध पैलूंचा समावेश असलेले प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, प्रसार भारतीची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था, नॅशनल अकॅडमी ऑफ ब्रॉडकास्टिंग आणि मल्टीमीडिया, ( एन ए बी एम) एबीयू मीडिया अकादमीशी सहकार्य करत आहे, असे ते म्हणाले.
आशयाची देवाणघेवाण, सह-निर्मिती, क्षमता बांधणी, इत्यादी क्षेत्रात भारताने 40 देशांसोबत द्विपक्षीय करार केले असून त्यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, फिजी, मालदीव, नेपाळ, दक्षिण कोरिया, थायलंड आणि व्हिएतनाम अशा अनेक एबीयू सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.
“लोकांची सेवा- संकटकाळात प्रसारमाध्यमांची भूमिका” ही अबूच्या यंदाच्या सर्वसाधारण सभेची संकल्पना कोविड सारख्या संकटाला सामोरं गेल्यानंतर अत्यंत सुसंगत अशी आहे, असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी यावेळी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com