Election officials warn to take action against those who violate the code of conduct
आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा
प्रचारासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, झेंडे, जाहिराती संबंधित उमेदवाराने काढून घ्यावे
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपत आहे. या कालावधीनंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.
मतदान बंद होण्याच्या ४८ तास अगोदर सुरु असलेला प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते आदींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये. अशा नेत्यांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदार संघ सोडावा. उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही. केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही. असा पदाधिकारी राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण घोषित करील आणि प्रस्तुत कालावधीतील त्याची ये- जा ही सामान्यपणे त्याचे पक्ष कार्यालय आणि त्याचे राहण्याचे ठिकाण यापुरतीच मर्यादित राहील.
उमेदवारास मतदान संपण्यापूर्वीच्या ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही जाहीर सभा आणि मिरवणुका आयोजित करता येणार नाही. कोणत्याही जाहिराती किंवा प्रायोजित कार्यक्रम किंवा एखाद्या इराद्याने उमेदवाराला पाठिंबा देणारे किंवा टीका करणारे कोणतेही अहवाल, निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारे किंवा प्रभावित करणारे कोणतेही अहवाल प्रतिबंधित असतील. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या सूचनांप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक विभाग कटिबद्ध आहे, असे श्रीमती स्नेहा किसवे देवकाते यांनी सांगितले.
प्रचारासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, झेंडे, जाहिराती संबंधित उमेदवाराने काढून घ्यावे, तसेच कोणत्याही प्रकारे वाहनांद्वारे प्रचार करण्यास प्रतिबंध असेल, याबाबत पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना आचारसंहिता कक्षाला देण्यात आल्या आहेत, असेही श्रीमती देवकाते यांनी कळविले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com