Agitations against rebel MLAs in various places
बंडखोर आमदारांच्या विरोधात ठिकाठिकाणी आंदोलनं
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गुवाहाटी इथं असलेल्या आमदारांच्या विरोधात आज ठिकाठिकाणी आंदोलनं करण्यात आली तर काही ठिकाणी या आमदारांच्या समर्थकांनीही त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
धुळ्यात आज शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले. शिवसेनेशी बंडखोरी करणार्या आमदारांचा आणि मंत्र्यांचा तिव्र निषेध करत दे दणका मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या अखेरीस बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे आणि धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटात सामील झाल्यानं त्यांच्या विरोधात जयसिंगपूरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले. तर, यड्रावकर समर्थकही त्यांच्या कार्यालयासमोर एकवटले.
यावेळी पोलिसांनी खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तरीही शिवसैनिकांनी यड्रावकरांच्या कार्यालयापर्यंत जावू न दिल्यानं शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही जिल्हाप्रमुख आणि सर्व पदाधिकारी हे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मेळावा घेऊन ते पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केलं.
त्यानंतर संतप्त शिवसैनिकांचा मोर्चा आमदार संजय राठोड यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघाला मात्र पोलिसांनी हा मोर्चा दत्त चौकात अडवला. याठिकाणी शिवसैनिकांनी संजय राठोड, पालकमंत्री संदीपान भुमरे, एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या प्रतिमांना लाथानी तुडवून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन केलं. नंदुरबार जिल्ह्यातही शिवसैनिकांनी आंदोलन केलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com