Uddhav Thackeray appeals to all Maharashtra lovers to unite against the Governor
राज्यपालांच्या विरोधात तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन
महाराष्ट्र बंदचा इशारा
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तमाम महाराष्ट्रप्रेमींनी याविरोधात एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ते आज मातोश्री निवासस्थानी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.
तसेच त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला. कुणीही येत आणि टपली मारून जातं अशी सध्या महाराष्ट्राची अवस्था झाली आहे.
कर्नाटकचे मुख्यंत्री महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगतात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवतांचा अपमान होत आहे. पण मुख्यमंत्र्यांना त्याची कोणतीही खंत किंवा चिंता नाही. काहीतरी गोलमाल उत्तर देऊन ते वेळ मारून नेतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या प्रदेशावर हक्क सांगताहेत , यामागे कुणाचा हात आहे, हे तपासलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ चालू आहे. मिंधे, खोके सरकारमुळे राज्याची अवहेलना सुरू आहे. सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत का? अशा शद्बात उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारव निशाणा साधला आहे.
तसेच राज्यपालांना न हटवल्यास महाराष्ट्र बंदचे संकेत देखील उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं राज्यपालांना त्वरित माघारी बोलावून घेतलं नाही तर महाराष्ट्र प्रेमी आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
केंद्रात सत्ता असणाऱ्या पक्षाच्या विचारसरणीची व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमली जाते, याबद्दल रोष व्यक्त करत, राज्यपाल नेमणुकीचे निकष ठरवण्याची गरज निर्माण झाल्याचं ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल झाली नाही कारण मंत्री गुजरातमध्ये प्रचाराला गेले होते. त्यांनी राज्य वाऱ्यावर सोडलं आहे, या सरकारमुळेही महाराष्ट्राची अवहेलना होत आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com