Along with news, journalists also make a significant contribution to the sustainable development of the state
बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्युज नेटवर्क ने आयोजित केलेल्या चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायाभूत सुविधा कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विवेक देशपांडे, रंजीत कक्कड आणि अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद घेऊन पत्रकारांनी वाटचाल केली पाहिजे. राज्य शासनही पत्रकारांसाठी वैद्यकीय सहायता योजना, अधिस्वीकृती योजना, पत्रकारांना निवृत्तीनंतर सन्मान अशा काही महत्त्वपूर्ण योजना राबविते. या योजनांमध्ये काही सुधारणा करण्याबाबत काही सूचना येत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक त्या सुधारणा या योजनांत जरूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पत्रकारांचे काम केवळ बातमी लिहिणे नाही तर राज्याच्या शाश्वत विकासासाठी सुद्धा त्यांचे योगदान महत्वाचे आहे. गेल्या सहा महिन्यातील राज्य शासनाचे काम माध्यमांनी पाहिले आहे. लोकाभिमुख काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास, समाजामध्ये दुर्लक्षित दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग, समृद्धी महामार्ग, विदर्भासाठी नागपूर अधिवेशनात विविध निर्णय राज्य शासनाने घेतले. माध्यमांनी ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले, असे त्यांनी सांगितले.
माध्यम क्षेत्रात गेल्या तीन – साडे तीन दशकात खूप बदल झाले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पत्रकारांनी या बदलाची नोंद घेतली पाहिजे. अर्थात या बदलांमुळे पत्रकारांचे महत्व कमी होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वृत्तपत्रांनी मोठी भूमिका बजावली. आजही नागरिकांना, वाचकांना खऱ्या अर्थाने सज्ञान करणे आणि लोकशिक्षणाची भूमिका माध्यमांनी पार पाडण्याची गरज आहे. आपल्या समाजापुढील अंमली पदार्थांचा वाढता वापर, नक्षलवाद, दहशतवाद, रोजगार, बदललेल्या कुटुंब व्यवस्था, बाजारू चंगळवाद या समस्यांचा वेध घेऊन माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक अशी भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गडचिरोली येथील नक्षलवादाचा बिमोड करण्याची राज्य शासनाची भूमिका असून तेथील नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात असल्याचे सांगितले.
यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारणीत मोलाचा वाटा असणारे श्री. मोपलवार, मनरेगा मध्ये विविध सुधारणा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
अप्रतिम मीडियाच्या वतीने प्रकाश कथले (वर्धा), हेमंत जोशी आणि योगेश त्रिवेदी (मुंबई) यांना चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय, माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व, पर्यावरण वृत्त, वने व इको टुरिझम वृत्त, टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन वृत्त, उद्योग/व्यापार वृत्त, कला-संस्कृती, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, ग्रामीण विकास, सहकार अशा विविध विभागात पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ‘अप्रतिम महावक्ता’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. फळे यांनी तर सूत्रसंचालन सोनाली शेटे यांनी केले. आभार विवेक देशपांडे यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com