Amrit’ organization for open category youth will start soon
खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी ‘अमृत’ संस्था लवकरच सुरू होणार
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
ठाणे : खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील हुशार मुलांसाठी विविध योजना, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्य करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या (बीबीएनजी) वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित परिवर्तन 2023 या उद्योग परिषदेत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ब्राह्मण समाजातील उद्योजकांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्यम कौस्तुभ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजाला एकेकाळी नोकरी हाच पर्याय होता. अलिकडच्या काळात मात्र आता सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाज अग्रेसर दिसून येतो आहे. उद्योग क्षेत्रात ब्राह्मण समाजातील तरुणांची गरुड झेप पहावयास मिळत आहे. ब्राह्मण समाजात यशस्वी उद्योजक पहायला मिळतात.
जगातील प्रमुख 7 कंपन्यांपैकी 4 प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ब्राह्मण आहेत. ब्राह्मण समाजातील संघटना देखील नि:स्वार्थ वृत्तीने काम करताना दिसतात. बीबीएनजी सारख्या संस्था समाजासाठी वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करतात, याचे समाधान वाटते. समाजाला ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक होते ते ते देण्याचे काम ब्राह्मण समाजातील मान्यवरांनी केले आहे.
आजच्या जगात व्यावसायिकता, उद्योगशिलता, नव्या उद्योगाला समजून घेणे व त्या क्षेत्रात पुढे जाणे आवश्यक आहे. दूरसंचार क्रांतीमुळे तरुण पिढीला मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे परिवर्तन घडत आहे. हे बदलते मूल्य समजून घेण्यात तरुणाई काम करत आहे. जगात उद्योग आणि विविध क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध हे सांगणारे व या संधी कशा प्राप्त कराव्यात याबद्दल मार्गदर्शनाचे काम बीबीएनजी सारख्या संस्था करत आहेत. अनेक लोकांनी या संधीचा लाभ घेऊन आपलं विश्व तयार केले आहे.
समाजासाठी संस्थेच्या कार्यामध्ये काहीही मदत लागली, तर मी आपल्या पाठिशी उभा आहे. विशेषतः तरुणांच्या रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काम करु. मागील काळात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे 605 कोर्सेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्धे शुल्क भरण्याचा निर्णय घेतली. हुशार विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने जगातील उत्तम विद्यापीठामध्ये शिकता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्रीपाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com