Anna Bhau Sathe is a symbol of multicultural unity – Dr. Shripal Sabnis
बहुसांस्कृतिक एकतेचे प्रतिक म्हणजे अण्णा भाऊ साठे – डॉ.श्रीपाल सबनीस
पुणे : “बहुसांस्कृतिक एकतेचे प्रतिक म्हणजे अण्णा भाऊ साठे होय. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मार्क्सवादी होते की आंबेडकरवादी होते, ह्यावर आजही वादविवाद होत आहेत. परंतु माझ्या मते, ते मार्क्सवादी तर होतेच.शिवाय आंबेडकरवादीही होते. मात्र ते खऱ्या अर्थानं मानवतावादी अधिक होते आणि अशा अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाचा डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांनी जो शोध घेतला आहे,तो निर्णायक महत्त्वाचा ठरतो “, अशा आशयाचे उद्गार अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस ह्यांनी काढले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या डॉ.अविनाश सांगोलेकरलिखित ‘ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांचे काव्यवाड्मय : एक शोध ‘ ह्या समीक्षालेखसंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर डॉ.श्रीपाल सबनीस,अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य राजेश पांडे, अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे, डॉ.प्रभाकर देसाई, अॅड.श्रीधर कसबेकर, डॉ.धनंजय भिसे, डॉ.अंबादास सगट हे होते. ह्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, मातंग साहित्य परिषद आणि शब्दवैभव प्रकाशन ह्यांनी संयुक्तपणे केले होते.
प्रारंभी मातंग साहित्य परिषदेचे समन्वयक डॉ.अंबादास सगट ह्यांनी स्वागत केले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ.सुनील भंडगे ह्यांनी प्रास्ताविक केले, तर मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे ह्यांनी भूमिकाकथन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.प्रभाकर देसाई, हिंदी विभागप्रमुख डॉ.विजय रोडे , तसेच ज्येष्ठ साहित्यिक ॲड.श्रीधर कसबेकर आणि स्वतः लेखक डॉ.अविशनाश सांगोलेकर ह्यांनी समीक्षालेखसंग्रहाबाबतचे आपले विचार विशद केले.शेवटी शब्दवैभव प्रकाशनाचे डॉ.मोरेश्वर नेरकर ह्यांनी आभारप्रदर्शन केले.सूत्रसंचालन डॉ.मोहन शिंदे ह्यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com