Union Finance Minister’s announcement to impart technical training to Goods and Services Tax employees to curb tax evasion
करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी वस्तू आणि सेवा कर कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा
निर्मला सीतारामन यांच्या हस्ते नवी मुंबईत खारघर येथे ‘सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर परिसरा’त सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासी संकुलाचे उद्घाटन
नवी मुंबई: केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सीबीआयसी अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमाशुल्क मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई प्रदेश केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागात कार्यरत अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्गासाठी नवी मुंबईत खारघर येथे उभारण्यात आलेल्या ‘केंद्रीय जीएसटी परिसर’ या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन केले.
या वेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या प्रकल्पात राहायला येणाऱ्या सीबीआयसीच्या विविध श्रेणीतील पहिल्या पाच घरांचे मालक असलेल्या अधिकाऱ्यांना समारंभपूर्वक घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी हा प्रकल्प हाती घेऊन, त्यासंबंधी परवानग्या मिळवून उत्तम पद्धतीने हे कार्य पूर्ण केल्याबद्दल सीबीआयसीचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी वर्गाचे विशेष कौतुक केले.
देशात ज्या ज्या ठिकाणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या कक्षेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी असे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वाला नेले जात आहेत अशा ठिकाणी उपस्थित राहून मनाला अत्यंत समाधान वाटते अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
सीबीआयसीच्या कामगिरीबद्दल बोलताना, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, “तुम्ही सर्व असेच उत्तम काम यापुढेही करत रहा, महसूल निर्माण होईल याकडे लक्ष द्या, तुमच्या या कामाची नक्कीच दखल घेतली जात आहे, पंतप्रधानांनी नुकताच जीएसटी महसुलाचे प्रमाण वाढत असल्याचा विशेष कौतुकास्पद उल्लेख केला.”
यावेळी बोलताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर चुकवेगिरीसारख्या फसवणुकीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटीक्स, आयओटी तसेच अशा इतर तंत्रज्ञानांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या अधिकाऱ्यांना अधिक उत्तम रीतीने प्रशिक्षित करण्याची गरज देखील व्यक्त केली.
करबुडवेगिरीला आळा घालण्याच्या दृष्टीनं वस्तू आणि सेवा कर कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. करवसुली यंत्रणेतले कच्चे दुवे आणि पळवाटा ओळखून त्यांना पायबंद घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिलं जाईल. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर दिला जाईल असं त्या म्हणाल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com