Union Minister Shri Anurag Thakur inaugurates 40th ‘Hunar Haat’ in Mumbai
मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित 40व्या ‘हुनर हाट’ चे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले उद्घाटन
मुंबई : हुनर हाटसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत साकार करण्याला बळकटी मिळत आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. देशाच्या प्रत्येक भागातील ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव आणि कला आणि कौशल्य यांच्या प्रदर्शनाची संधी देणाऱ्या हुनर हाट ची 40वी आवृत्ती 16 ते 27 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात सुरु आहे. या ‘हुनर हाट’ चे औपचारिक उद्घाटन आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, , त्यावेळी ते बोलत होते .
या प्रदर्शनात, 31 पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास 1,000 विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत.ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर आणि शिल्पकारांचा समावेश आहे, असे ठाकूर म्हणाले.यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ,महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव एस पी सिंह टेवटिया व्यासपीठावर उपस्थित होते.
स्किल इंडिया उपक्रमाअंतर्गत नक्वी यांच्या मंत्रालयातर्फे उस्ताद योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम होत आहे ,याचा युवकांनी लाभ घेत नोकरी मागणारे न होता नोकरी देणारी व्यक्ती व्हावे असे ठाकूर म्हणाले.
या उपक्रमातून 9 लाख रोजगार निर्माण करण्याचे मोठे कार्य अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केले आहे असे सांगत ठाकूर म्हणाले कि या उपक्रमाच्या संचालनात कोणत्याही कलाकाराला स्थलांतरित व्हावे लागले नाही हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.तसेच कारागिरांना स्वतःच्या गावातच राहून स्वतःचे उत्पन्न दुप्पट चौपट करण्याची संधी देण्याचे कार्य माध्यमातून नक्वी यांनी केले आहे.
दुबई आणि बहुतेक आखाती देशांमध्ये आज सर्वात जास्त संख्येने कुशल भारतीय लोक कार्यरत आहेत असे निरीक्षण नोंदवून ठाकूर म्हणाले कि तेजस उपक्रमाअंतर्गत येत्या एका वर्षाच्या आत 30 हजार भारतीयांना कौशल्य प्रशिक्षण देऊन दुबईमध्ये पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हुनर हाट म्हणजे भारतीय कला, संस्कृती आणि कौशल्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठीचा एक आदर्श मंच आहे. यामध्ये तीन व्ही म्हणजेच विश्वकर्म्याच्या वारशाचा विकास एका समर्थ आणि विकसित मंचाच्या माध्यमातून झाला आहे. सरकारने या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ कला आणि वारसा यांचेच जतन केले आहे असे नाही तर स्वदेशी उत्पादनांना नवे बाजार आणि नव्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या आहेत असे ठाकूर यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau