Union Transport Minister’s appeal to use alternative fuel to make transport business economically affordable
वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांचं आवाहन
सरकारी-खासगी भागीदारीतून विजेवर आधारित सार्वजनिक वाहतूक प्रणालीचे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
नवी दिल्ली : वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्हायचा असेल तर पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित इनसाईट २०२२ या गुंतवणूक विषयक संमेलनात ते बोलत होते. वाहतुकीसाठी चांगले रस्ते सरकार तयार करत असून पेट्रोल आणि डिझेल ऐवजी वीज, जैव इंधन अशा पर्यायांना प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की सरकारी-खासगी भागीदारीतून अत्यंत व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित विजेवर आधारित सार्वजनिक वाहतूक प्रणालीला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळेल. ते म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उत्तम नमुना अंमलबजावणीसाठी तयार असला तर अशावेळी भांडवली गुंतवणूक ही समस्या असू शकत नाही.
वैयक्तिक वाहनांचा वापर करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. लंडनच्या वाहतूक व्यवस्थेची प्रशंसा करत, केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, सर्वसामान्य लोकांना किफायतशीर दरात अधिक आरामदायी वाहतूक व्यवस्था हवी आहे.
बस महामंडळांना सहन करावा लागणारा तोटा टाळण्यासाठी तसेच अधिक आरामशीर प्रवासासाठी बसच्या तिकिटांच्या प्रत्यक्ष वितारणाऐवजी, बस प्रवासात कार्ड अथवा क्यूआर कोडवर आधारित प्रवेश-निकास प्रणाली वापरण्यात यावी असा प्रस्ताव त्यांनी सर्वांसमोर मांडला.
विजेवर चालणाऱ्या बसचा वापर सुरु झाल्यामुळे, आता प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल तसेच आपल्या देशाला डिझेल आणि कच्च्या खनिज तेलाची आयात कमी करणे शक्य होईल यावर त्यांनी भर दिला.
वाहन उद्योग क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची सर्वाधिक क्षमता असून या उद्योगाने देशात 4 कोटी रोजगार निर्माण केले आहेत तसेच या क्षेत्राने केंद्र तसेच राज्य सरकारांना सर्वात जास्त महसूल मिळवून दिला आहे म्हणून आम्ही या क्षेत्राची वाढ 15 लाख कोटींपर्यंत करण्याचा प्रयत्न करीत आहोत असे गडकरी म्हणाले.
सीईएसएल या सरकारी कंपनीला 5450 ई-बस पुरविण्याची निविदा मिळाल्याबद्दल कंपनीच्या संचालक वर्गाचे अभिनंदन करत गडकरी म्हणाले की ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी निविदा आहे. हरित हायड्रोजन भविष्यातील वाहतुकीचा महत्त्वाचा घटक आहे असेही ते पुढे म्हणाले. दिल्ली ते जयपूर या प्रवासासाठी ई-रस्ता उभारण्याचा प्रस्ताव देखील त्यांनी दिला. आर्थिक व्यवहार्यता आणि शाश्वत विकासासाठी पर्यायी इंधने, नवे तंत्रज्ञान तसेच वाहतूक क्षेत्रातील अभिनव संशोधने यांचा शोध जारी राहायला हवा अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com