Appeal to use cloth bags instead of plastic
प्लॅस्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन
स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होऊन प्लॅस्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
ई संजीवनी अॅपच्या माध्यमातून १० कोटींहून अधिक रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपचार
नवी दिल्ली : देशातल्या नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचा निर्धार करावा आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या नागरिकांना केलं. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या ९८ व्या भागात ते नागरिकांंना संबोधित करत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की स्वच्छ भारत अभियानानं देशातल्या जनसहभागाचे अर्थच बदलून टाकले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत देशातल्या विविध भागात होत असलेल्या मोहिमांची माहिती त्यांनी दिली.
हरियाणातल्या दुल्हेडी गावातले युवक सकाळी ४ वाजता उठून स्वच्छता अभियान राबवत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. सर्वांनी ठरवलं तर आपण स्वच्छ भारत अभियानात मोठं योगदान देऊ शकतो.
कमीत कमी प्लॅस्टिक पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. हा संकल्प आपल्याला तर आनंद देईलच शिवाय इतरांनाही प्रेरणा देईल.
यावेळी त्यांनी ई संजीवनी अॅपच्या माध्यमातून १० कोटींहून अधिक रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपचार मिळाल्याबद्दल डॉक्टर आणि रुग्णांचं कौतुक केलं. कोरोना काळात ई-संजीवनी अॅपनं दिलेल्या टेलि कन्सलटेशनचा फायदा लोकांना कसा झाला हे आपण पाहिलंच आहे.देशातल्या नागरिकांनी तंत्रज्ञानाचा वापर आयुष्यात कसा केला आहे, याचं हे जिवंत उदाहरण आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.यावेळी त्यांनी ही सेवा देणारे डॉक्टर आणि या सेवेचा लाभ घेतलेल्या रुग्णाशीही संवाद साधला आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले.
भारतानं सिंगापूरसोबत UPI Pay now link सुरू केल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. ज्याप्रमाणे देशातल्या देशात पैसे हस्तांतरित होतात त्याचप्रमाणे यासुविधेमुळं भारत आणि सिंगापूरमध्ये पैसे हस्तांतरित होऊ शकतील.
पश्चिम बंगालमध्ये ७०० वर्षांपूर्वी बंद झालेला ‘त्रिवेणी कुंभ महोत्सव’ पुन्हा सुरू केल्याबद्दल त्यांनी स्थानिक नागरिकांचं कौतुक केलं. युवकांना देशातल्या समृद्ध परंपरांशी जोडण्याचा हा अतिशय उत्तम उपक्रम आहे.
देशातल्या लुप्त झालेल्या अशा अनेक परंपरांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला एकता दिनानिमित्त काही स्पर्धांची घोषणा त्यांनी मन की बात मधून केली होती. त्यात ७०० हून अधिक जिल्ह्यातल्या ५ लाखाहून अधिक नागरिकांनी भाग घेतला होता. विविध २० भाषांमधून स्पर्धकांनी यात प्रवेशिका पाठवल्या होत्या. यास्पर्धेतल्या विजेत्यांची घोषणा त्यांनी यावेळी केली. सांगलीतल्या सचिन अवसारी यांनी रांगोळी स्पर्धेत जालियनवाला बाग हत्याकांड आणि शहीद उधमसिंग यांच्या पराक्रमाची रांगोळी काढली होती, असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी प्रदान करण्यात आलेल्या उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कारांची माहिती त्यांनी आज दिली. संगीत आणि कला क्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. संग्रामसिंग भंडारे यांना वारकरी किर्तनासाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. शेवटी त्यांनी नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व सण-समारंभ स्थानिक उत्पादनं वापरून साजरे करण्याचा सल्ला दिला.
Hadapsar News
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com