Approval for the first phase of Jejuri Gad Shrine Development Plan
ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता
मुंबई : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करताना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्त्वीय जाण असलेल्या संस्थेमार्फत ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
जेजुरी गडावरील मंदिराचे जतन आणि संवर्धन करताना परिसरातील इतर मंदिरेही पुरातत्व विभागाअंतर्गत संरक्षित करावीत, असेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात जेजुरी मंदीर व गड जतन आणि संवर्धन तसेच परिसर व जल व्यवस्थापनाचे काम करण्यात येणार आहे.
जेजुरी गड विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे.
यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता, अनियोजित व हानिकारक जोडण्या काढणे, खराब झालेल्या चुन्याच्या गिलाव्याची डागडुजी, पाणी गळती थांबविण्यासाठी डागडुजी, विद्युत सोयी, पाणी पुरवठा, निचरा व्यवस्था, मल:निसारण आणि त्या पाण्याचा पुनर्वापर, योग्य वायुविजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन, भक्तांसाठी सोयीसुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक योजना आदी कामे करण्यात येणार आहेत.
श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र मंदिराचे सपोर्ट क्षेत्रफळ १६७ चौरस मीटर असून कोटाचे क्षेत्रफळ १२४० चौ मी.आहे. येथे यात्रा उत्सवाच्या वेळी दर दिवशी सुमारे दीड ते दोन लाख तर वर्षात सुमारे ४० ते ५० लाख भाविक भेट देतात. या मंदिरास ऐतिहासिक समृद्ध वारसा असून अनेक राज्यांतील नागरिकांचे हे कुलदैवत आहे. मागील २५० वर्षात याचे जतन आणि संवर्धन झाले नसल्याने ते अत्यावश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐतिहासिक वास्तूंवर झाडे उगवू नयेत, यासाठी उपाययोजना करून वास्तूंचे दगडांवर रंगरंगोटी न करता ते मूळ स्वरूपात ठेवावीत असे सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही कामे करावीत अशी सूचनाही त्यांनी केली. तर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील कामे या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फतच करावीत, अशी सूचना केली.
सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘खंडेरायाची जेजुरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरी गड (ता. पुरंदर, जि. पुणे) या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरीता निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून रु.३४९.४५ कोटी रकमेचा श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण तीन टप्प्यांमध्ये राबविण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
हडपसर न्युज ब्युरो