Arvind Kejriwal will visit Mumbai
अरविंद केजरीवाल येणार मुंबई दौऱ्यावर
घेणार उद्धव ठाकरे अन् शरद पवार यांची भेट
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल पुढच्या आठवडयात मुंबईला येणार आहेत. अरविंद केजरीवाल हे २४ मे रोजी उद्धव ठाकरे आणि २५ मे रोजी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
दिल्लीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातकेंद्र सरकारच्या अध्यादेशवरून दिल्ली सरकार व मोदी सरकार आमने- सामने आली आहेत. केंद्र सरकारच्या या अध्यादेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री विरोधी पक्षांच्या नेत्यांचे समर्थन मागत आहेत.
सध्याच्या दिल्ली सरकारवर केंद्र सरकार टाकत असलेला दबाव कमी करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावं या कारणासाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे. या भेटीदरम्यान ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत
मुंबई भेटीआधी केजरीवाल हे २३ मे रोजी कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीदेखील भेट घेणार आहेत.
दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांनी देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांकडे केंद्राच्या विरोधातील लढाईस पाठिंबा मागितला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेदेखील उपस्थित होते. बिहारच्या दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीतील आप सरकारचे समर्थन केले आहे.
केंद्र सरकारने १९ मे रोजी दिल्ली सरकारच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीबाबत अध्यादेश प्रसारित केला आहे. या अध्यादेशाच्या माध्यमातून दिल्ली राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीचे अंतिम अधिकार पुन्हा दिल्लीच्या नायब राज्यपालांना देण्यात आले आहेत. यामुळे केंद्र सरकार व केजरीवाल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
लोकशाही संपवायला निघालेल्या भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आपने म्हटले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com