Aurangabad-Pune will be the new expressway – Union Road Transport Highways Minister
औरंगाबाद पुणे नवीन द्रुतगतीमार्ग होणार- केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री
औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते संपन्न
मुंबई / औरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे हे सध्या 225 किलोमीटर असणारे अंतर औरंगाबाद ते पुणे या प्रस्तावित नवीन एक्सेस कंट्रोल द्रुतगती महामार्गा मूळे केवळ सव्वा तासात पूर्ण करता येईल . या महामार्ग वरून 140 किलोमीटर प्रतितास असा प्रवास करता येईल .सुमारे 10 हजार कोटी रुपयांच्या या प्रस्तावित महामार्गाचे भूमिपूजन आपण करू अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज औरंगाबाद येथे केली .
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील 5 हजार 569 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या एकूण 240 किलोमीटर लांबीच्या सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी तसेच लोकार्पण सोहळा आज त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते .याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्याचे महसूल तसेच ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीने 130 किलोमीटर लांबीच्या औरंगाबाद ते तेलवाडी , प्रकल्प नगर नाका ते केंब्रिज स्कूल तसेच शिवूर ते येवला रोड या रस्त्याच्या लोकार्पण झाल्यामुळे औरंगाबाद शहरातील वाहतूक कोंडीला आळा बसणार असून मोठी वाहन हे शहराच्या बाह्य भागातूनच जाणार आहेत .
सुमारे 2, 254 कोटी रुपयाच्या तरतुदीने 110 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या भूमिपूजन करण्यात आले आहे . यामध्ये औरंगाबाद ते पैठण हा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याच्या भूमिपूजनामुळे या ठिकाणी असणारे प्रार्थना स्थळे व पर्यटन स्थळे यामध्ये भाविकांना येण्यासाठी सोय निर्माण होणार आहे . चिखलठाणा ते वाळुज पर्यंत सुद्धा मेट्रो तसेच डबल डेकर ब्रिज राहणार असून पैठण रोड ते पुणे रोड येथील उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे . औरंगाबाद शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण द्वारे होणाऱ्या विविध कामाबद्दल यावेळी गडकरी यांनी माहिती दिली.
मास रॅपीड ट्रान्सपोर्ट सिस्टिम – एमआरटीएस अंतर्गत औरंगाबादमध्ये दोन मेट्रोचे रूट चिखलठाणा ते क्रांती चौक औरंगाबाद रेल्वे स्टेशन त्याचप्रमाणे औरंगाबाद रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट पर्यंत महामेट्रो तर्फे प्रस्तावित असून सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीने होणाऱ्या या कामासंदर्भातील अहवाल महा मेट्रो तयार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद शहरात 2014 पूर्वी 145 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग होता 2014 नंतर त्याची लांबी सुमारे 450 कोटी किलोमीटर एवढी झाली असून आता औरंगाबाद शहरात राष्ट्रीय महामार्गाची लांबी 600 किलोमीटर आहे. 2024 पर्यंत 25 हजार कोटी रुपयांची कामे आपण औरंगाबादमधे पूर्ण करू असे आश्वासन सुद्धा गडकरी यांनी यावेळी दिले.
लोकार्पण झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये आडगाव गांधीली इथून 6 लाख घनमीटर तसेच इतर ठिकाणाहून सुमारे सात लाख घनमीटर अशी एकूण 13 लाख घनमीटर एवढी माती काढण्यात आली व मातीचा वापर या रस्त्याच्या बांधकामात करण्यात आला. मातीच्या संकलनातून निर्माण झालेल्या तलावांमध्ये सुमारे 1 ,350 टीमसी पाण्याचा साठा निर्माण झाला . त्यामुळे औरंगाबाद शहरातील पाणीटंचाई काही अंशी सुटण्यासाठी मदत झाली आहे असेही गडकरी यांनी यावेळी सांगितलं .
सुखी संपन्न मराठवाडा, शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढ, पर्यटन रोजगार यांची भरभराट यासाठी रस्तेविकास महत्त्वाचा आहे .2024 संपण्यापूर्वी मराठवाड्याचे सर्व रस्ते अमेरिकेच्या रस्त्या प्रमाणेहोतील असंही त्यांनी सांगितलं.
याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, जालन्यामध्ये ड्रायपोर्ट यावर्षी सुरू करण्यात येणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक खर्च कमी होईल .रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण यावरही आपला भर असून मनमाड ते औरंगाबाद या सुमारे एक हजार रुपये कोटीच्या तरतुदीने रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं की औरंगाबाद ऑटो, फार्मा, टुरिझम साठी प्रसिद्ध असून या भागात दळणवळणाच्या सुविधा झाल्यास या भागाचा कायापालट होईल. औरंगाबाद शहरात प्रस्तावित असणाऱ्या विकास कार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली .
महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला येत असलेल्या वनविभागाच्या अडचणीबाबत राज्य शासनाच्या समन्वयाने आपण त्या दूर करू असे आश्वासन दिले .
या कार्यक्रमाला औरंगाबाद शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी राजेश अग्रवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, औरंगाबाद शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
हडपसर न्युज ब्युरो