A decision on the autorickshaw rate hike is pending till the next meeting of the authority
ऑटोरिक्षांच्या दरवाढीचा निर्णय प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामतीमधील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.
ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय २५ जुलै रोजी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणेच्या बैठकीत घेण्यात आला होता. पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान देय असलेल्या सद्याच्या २१ रूपये भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर २३ रूपये व त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे १४ रूपयावरून १५ रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र भाडेदरवाढीचा पुर्नविचार व्हावा, यासाठी विविध रिक्षा संघटना व प्रवासी संघटनांनी मागणी केली आहे. या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणारी ऑटोरिक्षा भाडेदरवाढ प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
भाडेदरवाढी संदर्भातील पुढील निर्णय होईपर्यंत सध्याचे पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान २१ रूपये व त्यापुढील प्रत्येक किमीसाठी १४ रूपये हा दर कायम ठेवण्यात आला आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com