‘अविष्कार -२०२३’ चे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

Governor Bhagat Singh Koshyari राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Inauguration of ‘Avishkar-2023’ at Savitribai Phule Pune University by the Governor

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘अविष्कार -२०२३’ चे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

अविष्कार -२०२३ द्वारे नव्या संशोधनाला चालना मिळेल-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे : अविष्कार -२०२३ महोत्सवाच्या माध्यमातून देशात नव्या संशोधनाला चालना मिळेल आणि त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

Governor Bhagat Singh Koshyari राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ‘अविष्कार -२०२३’ च्या उद्घाटन प्रसंगी दूरदृष्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मोहन वाणी, कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अविष्कार समितीचे राजेश पांडे, डॉ.संजय ढोले आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले, देशातील विद्यापीठातून नाविन्य आणि नवोन्मेशाला चालना देण्यात येत आहे. राज्यातल्या विद्यापीठातील विद्यार्थी या दिशेने चांगले प्रयत्न करीत आहेत. अविष्कार महोत्सवात सहभागी होणारे हे विद्यार्थी भविष्यात समूह भावनेने काम करून संशोधनाला अधिक वेळ देत देशाला आपल्या प्रतिभेचा परिचय देतील. त्यातून समाजासाठी उपयुक्त संशोधन होऊन स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे विद्यापीठ उच्च शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनावरही भर द्यावा-महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

यावेळी महसूलमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, अविष्कार महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळते. उद्याचा भारत अविष्कारच्या माध्यमातून पहायला मिळतो. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेचा वापर करून केलेल्या संशोधनामुळे देशाची मान उंचावण्याचे काम होते. शिवाय अशा उपक्रमाद्वारे मिळणाऱ्या आत्मविश्वासाच्या बळावर ते जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सक्षम होतात.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून बदलत्या काळानुसार विद्यार्थी केंद्रीत दृष्टीकोन स्वीकारण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक स्टार्टअप्स भारतात आहे. यात विद्यापीठांचाही मोलाचा सहभाग आहे. साधनांच्या मर्यादा असूनही आपले विद्यार्थी पुढे जात आहेत. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून २४ स्टार्टअप्स देशपातळीवर सुरू आहेत. विद्यापीठांमधील क्षमता आणि ज्ञानाचे आदानप्रदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना गती मिळेल आणि स्पर्धेच्या युगात त्यांची चांगली तयारी होऊ शकेल. शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्याच्यादृष्टीने कृषि क्षेत्रातील संशोधनावरही विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता विकसीत व्हावी यासाठी विद्यापीठांनी उद्योगाभिमुख, गरजाभिमुख अभ्यासक्रम राबविण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. विद्यापीठाकडून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव आल्यास त्यास शासन सहकार्य करेल, असेही मंत्री विखे-पाटील म्हणाले.

विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होतानाच नोकरी उपलब्ध करून देणारा व्हावे -कुलगुरू डॉ.कारभारी काळे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, ‘अविष्कार’मध्ये सहा विविध विभागात विद्यार्थ्यांकडून संशोधन प्रकल्प स्वीकारले जातात. यात आंतरविद्याशाखीय, तंत्रज्ञानाच्या विकासाद्वारे समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. समाजाची गरज ओळखून नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आणणे, स्वावलंबी होतांनाच नोकरी उपलब्ध करून देणारा व्हावे ही या उपक्रमामागची भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी देशपातळीवर नवा अविष्कार घडवून देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाले आहे. जगातील विविध मानांकनामध्ये विद्यापीठाने आपला ठसा उमटवला आहे. विद्यापीठाने मागील १४ अविष्कार महोत्सवात यश संपादन केले आहे. देशातील नामांकित विद्यापीठात याचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी देशाला आणि जगाला कसे समर्पित करता येईल याचा विचार करावा, असेही डॉ.काळे म्हणाले.

विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागेल-डॉ.मोहन वाणी

डॉ.वाणी म्हणाले, अविष्कार हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्ती वाढविण्यासाठी, नव्या कल्पना शोधण्यासाठी महत्वाचा आहे. या महोत्सवाद्वारे विद्यार्थी विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो. जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी आंतरविद्याशाखीय संशोधनाला महत्व आहे. गेल्या दोन दशकात भारताने संशोधन आणि विकास क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. ही प्रक्रीया पुढे नेताना अशा उपक्रमाद्वारे उच्च शिक्षण क्षेत्राला अधिक बळ देता येईल.

जगात वेगाने बदल होत असताना, स्पर्धा वाढत असताना, विद्यार्थ्यांनीदेखील अधिक प्रमाणात संशोधनात सहभाग घेतला पाहिजे. संशोधन प्रकल्प अयशस्वी होण्याची कारण शोधून त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. योग्य वेळ व्यवस्थापन, संशोधन कार्यातील अचूकता, संशोधन प्रकल्पाचे योग्य नियोजन, आंतरविद्याशाखीय चर्चासत्रांद्वारे ज्ञान प्राप्त करणे याद्वारे अधिक प्रकल्प यशस्वी करता येतील, असे त्यांनी सांगितले.

राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी रुची वाढावी आणि त्या माध्यमातून संशोधन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. समाजाला उपयुक्त संशोधन करण्याची प्रेरणाही विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळेल. कृषि क्षेत्रात संशोधनाला खूप वाव आहे. कमी खर्चात अन्नधान्याचे उत्पादन वाढवावे, पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबाबत संशोधनावरही विद्यार्थ्यांनी भर द्यावा. कृषि क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा, रोबोटीक्सचा उपयोग वाढविण्याबाबतही विचार व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी निरीक्षण समिती अध्यक्ष प्रा.सुनिल पाटील यांनीही विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी म्हणून अविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ६ विद्याशाखांमधील ६३६ विद्यार्थी सहभाग होणार आहेत. मुंबई येथे नामवंत उद्योगपतींसमोर यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

डॉ. ढोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्यात २००६ पासून या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. १५ व्या स्पर्धेत २२ विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. अणूशास्त्रज्ञ स्व. प्रा.एम.आर.भिडे यांचे नाव अविष्कार नगरीला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी महसूलमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते अविष्कार महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी महोत्सवात सहभागी प्रकल्पांची पाहणी केली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *