Awards to journalists and social organizations by the Office of the Chief Electoral Officer
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार
पत्रकार निवडणूक वार्तांकन पुरस्कार आणि सामाजिक संस्थांना मतदार मित्र पुरस्कार
पुणे : मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका आदींशी संबंधित बाबींचे उत्कृष्ट वार्तांकन यासाठी पत्रकार तसेच मतदार जागृतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्यासाठी यंदापासून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संर्स्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेवून पत्रकार आणि सामाजिक संस्थांना हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधीच्या माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मतदार मित्र पुरस्कार दिला जाणार आहे. दहा हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरीत केले जातील.
पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करू शकतात. त्यासाठी मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्यालयाचा अहवाल स्वरूप माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज democracybook2022@gmail.com या ई- मेल आयडीवर अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (भ्रमणध्वनी क्रमांक ८६६९०५८३२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com