BA, BCom, B.Sc… and many more..!!
बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी… आणि बरंच काही..!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘डिग्री प्लस ‘ साठी नावनोंदणी करण्याचे आवाहन: ३०० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध
पुणे : बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी.. या अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री रेडी’ बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिग्री प्लस उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात आता ३०० ते ३५० जागतिक पातळीवरील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूळ शुल्कपेक्षा कमी दरात उपलब्ध करून दिले आहेत.
‘डिग्री प्लस’ च्या माध्यमातून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, अर्थशास्त्र, संस्कृती आदी विषयातील अद्ययावत ज्ञान घेणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.
– डॉ.कारभारी काळे, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
नोव्हेंबर २०२१ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या नेतृत्वाखाली या डिग्री प्लस उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. जागतिक दर्जाच्या अनेकविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांसोबत करार करत हे अभ्यासक्रम विद्यापीठात उपलब्ध करून दिले आहेत.
यामध्ये हार्वर्ड बिझनेस ऑनलाईन, एडब्लूएस, सिंपली लर्न, सेलिब्रिटी स्कूल तर ईडीएक्सशी झालेल्या कराराच्या माध्यमातून आयबीएम, स्टँनफॉर्ड युनिव्हर्सिटीसारख्या अनेक नामांकित कंपन्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
डिग्री प्लस च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातले बहुदा एकमेव सार्वजनिक विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा तसेच महाविद्यालयांनी देखील याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे.
– डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
हे सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन असून यातील काही अभ्यासक्रम निःशुल्क आहेत. २०२२-२३ या वर्षाचे अभ्यासक्रमांचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहेत.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमात जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांनी यासाठी नावनोंदणी केली होती तर पाच हजार विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतला होता.
या अभ्यासक्रमासाठी कुठे अर्ज कराल? http://degreeplus.in
अभ्यासक्रम कोणासाठी?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी करत असलेले सर्व विद्यार्थी.
अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा कालावधी कोणता?
हे अभ्यासक्रम वर्षभर सुरू असतात. याचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com