Ban on disposable plastic items from 1 July 2022
एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर 1 जुलै 2022 पासून बंदी
एकदा वापरुन फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी कटिबद्ध असल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचा पुनरुच्चार
नवी दिल्ली : एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तू वर्ष 2022 पर्यंत वापरातून हद्दपार करण्यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी बिगुल वाजवले होते; त्या घोषणेला अनुसरून भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2021 रोजी ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम, 2021’ अधिसूचित केले.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करताना प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी देशाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उपयुक्तता मूल्य कमी आणि प्रदूषणकारकता जास्त असल्याने अशा वस्तूंचे बेकायदा उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर देशभरात 1 जुलै 2022 पासून बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
एकदाच वापरण्यात येणारं प्लॅस्टिक हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे याचा पुनरुच्चार पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केला.ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते.
एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तू वर्ष २०२२ पर्यंत वापरातून हद्दपार करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला अनुसरून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं १२ ऑगस्ट २०२१ रोजी ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम, २०२१’ अधिसूचित केले आहेत.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम, 2021 नुसार 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर 30 सप्टेंबर 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे; तर 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवरील बंदी 31 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहे.
बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीत कान स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिकच्या काड्या असलेले ईअर-बड्स, फुग्यांना लावलेल्या प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, गोळ्या, चॉकलेटला लावलेल्या प्लास्टिकच्या काड्या, आईस्क्रीमला लावलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरला जाणारा थर्मोकॉल, प्लास्टिकच्या ताटल्या, कप, पेले, काटे-चमचे, सुऱ्या, स्ट्रॉ, ढवळण्याच्या काड्या, ट्रे, मिठाईच्या खोक्यांवरील वेष्टने, आमंत्रण पत्रिका, सिगारेटची पाकिटे आणि मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे फलक यांचा समावेश आहे.
बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंऐवजी पर्यायी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी सूक्ष्म, लघु, मध्यम व्यवसायांना आवश्यक तांत्रिक सहाय्य पुरवण्याच्या हेतूने त्यांच्याकरता क्षमता बांधणी कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे.
त्यासाठी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी संस्था व ह्यांची राज्यस्तरीय केंद्रे ह्यांच्यासह केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे, प्रदूषण नियंत्रण समित्यांची मदत घेतली जात आहे. प्लास्टिक बंदीमुळे प्रभावित होणाऱ्या उत्पादकांना अन्य उत्पादनांकडे वळण्यासाठी सहाय्य करण्याच्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर 1 जुलै 2022 पासून बंदी”