Bank of Maharashtra organizes town hall meeting
बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे टाऊन हॉल सभेचे आयोजन
पुणे : सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने बँकेच्या पुणे शहर, पुणे पश्चिम व पुणे पूर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी पुण्याच्या एरंडवणे भागातील सिद्धी बँक्वेट येथे टाऊन हॉल सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी बँकेचे सुमारे १००० कर्मचारी उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव, बँकेचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजय कुमार व श्री आशिष पांडे यांचेसह सभेच्या अध्यक्षस्थानी होते. बँकेच्या मुख्य कार्यालयातील सरव्यवस्थापक, पुण्यातील तिन्ही विभागीय कार्यालयांचे विभागीय व्यवस्थापक व बँकेचे अन्य अधिकारी या सभेला उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना, २०२२ या वित्तीय वर्षात बँक ऑफ महाराष्ट्रने व्यवसाय वाढीमध्ये सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. भागधारक, ग्राहक, कर्मचारी आणि नियामक हे बँकेचे चार आधारस्तंभ असून बँकेच्या उत्तरोत्तर वर्धिष्णू होणाऱ्या यशामध्ये या सगळ्यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे श्री ए एस राजीव यांनी अधोरेखित केले.
भविष्यात बँकेला अशीच चमकदार कामगिरी करावयाची असेल तर त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा व्यापक उपयोग करण्यासोबतच ग्राहक सेवा आणि काम करण्यात तत्परता आपल्याला दाखवावी लागेल यावर श्री राजीव यांनी भर दिला आणि या बाबींना अन्यसाधारण महत्व असल्याचे ठामपणे सांगितले. गेल्या दोन वर्षात बँकेने सुमारे २०० शाखा सुरु केल्याची आणि आगामी दोन वर्षात आणखी २०० – ३०० शाखा सुरु करून कार्यक्षमतेच्या बाबतीत देशातील पहिल्या तीन बँकांमध्ये स्थान मिळविण्याचा बँकेचा दृढ़ निश्चय असल्याची माहिती श्री राजीव यांनी दिली.
बँकेच्या एककालिक व सर्वसमावेशक वाढीसाठी आपले ग्राहक आणि आपले स्पर्धक यांची आपल्याला सखोल माहिती असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कार्यकारी संचालक श्री ए बी विजयकुमार यांनी केले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने सुद्धा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कठोर मेहनतीला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. स्त्रिया या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करीत असल्यामुळे आणि बँकेमध्ये आपली प्रगती करून घेण्यासाठी व्यापक प्रमाणात संधी उपलब्ध असल्यामुळे बँकेच्या सेवेत स्त्रियांची संख्या अधिक प्रमाणावर वाढविण्यावर श्री ए बी विजयकुमार यांनी भर दिला.
बँकेच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी घेतलेल्या अथक मेहेनत व कष्टांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री आशिष पांडे यांनी बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आभार मानले.बँकिंग व्यवसाय वेगाने वाढविण्यासाठी भरपूर वाव असून अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारून व ग्राहकांना तत्परतेने सेवा देऊन आपण व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करू शकतो असे मत श्री पांडे यांनी व्यक्त केले.
डिजिटायझेशनचे वाढते महत्त्व आणि त्यामुळे व्यवसाय करण्याचा मार्ग कसा झपाट्याने बदलला आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. वित्तीय वर्ष २०२३ मध्ये अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल स्थान प्राप्त करेल असेही श्री पांडे यांनी संगीतले.
बँकेच्या प्रशिक्षण व विकसन विभागाचे सरव्यवस्थापक श्री संजय रुद्र यांनी प्रास्ताविक केले तर कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालयाच्या सहायक सरव्यवस्थापक श्रीमती अल्का आठवले यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
हडपसर न्युज ब्युरो