President’s rule was lifted, benefit of early morning swearing-in – Sharad Pawar
राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा झाला
– शरद पवार
कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे – शरद पवार
पुणे: पहाटेचा शपविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली नसती,. राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा झाला, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्हाला माहिती होती का? अजित पवार यावर काहीच का बोलत नाहीत?, असे प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी म्हटले की, पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही. काही गोष्टींबाबत तसंही बोलायची आवश्यकता नसते.
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
2019 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत पहाटे शपथ घेतली होती. परंतु हे सरकार काही तासांतच कोसळलं.
पहाटे झालेल्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
पहाटे शपथविधी करून सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही शरद पवार म्हणाले.
ते आज पुण्यात चिंचवड तसंच कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं वार्ताहर परिषदेत बोलत होते. कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असं ते म्हणाले.
प्रचारासाठी नेत्यांच्या गर्दीने निवडणूक जिंकता येत नाही. गर्दी जनमानसात किती प्रभावी आहे, हे महत्त्वाचं असतं, असंही पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना, पवार यांनी पहाटेच्या शपथविधीपाठोपाठ आणखीही खुलासे करावेत, असं आवाहन केलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com