Government’s role for Bhide Wada should be presented effectively in the court
भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी
-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती
पुणे : पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राज्याच्या महाधिवक्त्यांना केली.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची मुंबईत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच शासनाच्या भूमिकेसंदर्भात महाधिवक्त्यांना अवगत केले.
पुण्यातील भिडे वाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिला भगिनींसाठी प्रेरणास्थान आहे. येणाऱ्या पिढीनेदेखील इथून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, सदर जागेचे दोन मालक न्यायालयात गेले असल्याने सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी असे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी राज्याच्या महाधिवक्त्यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्मारकासाठीची शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी या भेटी दरम्यान केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com