83 candidates are in the fray for 5 seats in the biennial elections of the Maharashtra Legislative Council
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत ५ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात
मुंबई : विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राज्यात ५ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात आहे. एकूण २७ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर हे उमेदवार निवडणूक लढवत असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.
या जागांसाठी ३० जानेवारीला मतदान होणार असून मतमोजणी २ फेब्रुवारीला होईल. कोकण शिक्षक मतदार संघात सध्या ८ उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं ही निवडणूक होते आहे. सध्या भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे, यांच्यासह विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघात सध्या २२ उमेदवार रिंगणात असून ५ जणांनी माघार घेतली. शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघातून विद्यमान आमदार ना. गो. गणार यांना भाजपानं पाठिंबा दिला आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सध्या १४ उमेदवार रिंगणात असून एकानं माघार घेतली. विक्रम काळे यांचा कार्यकाळ संपत असल्यानं ही निवडणूक होते आहे. याठिकाणी भाजपानं किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी प्रदीप सोळुंके यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांनी अर्ज मागे न घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघात सध्या १६ उमेदवार रिंगणात असून ६ जणांनी माघार घेतली. शुभांगी पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी भाजपासह महाविकास आघाडीतल्या पक्षांकडे पाठिंब्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. भाजपानं याठिकाणी एकाही उमेदवाराला अजून पाठिंबा जाहीर केलेला नसून योग्यवेळी निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक २३ उमेदवार रिंगणात असून १० जणांनी माघार घेतली आहे. विद्यमान आमदार रणजीत पाटील यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीनं धीरज लिंगाडे यांना पाठिंबा दिला आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com