Big blow to Mahavikasaghadi, 5 BJP candidates won, Miracle of Devendra Fadnavis once again
महाविकासआघाडीला मोठा धक्का, भाजपचे 5 ही उमेदवार विजयी
देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा चमत्कार
मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निकालात देखील भाजपने पुन्हा एकदा महाविकासआघाडीला मोठा धक्का दिला आहे. गेले अनेक दिवस संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत.
10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकासआघाडी अशी चुरस वाढली होती. निकालात शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 5 उमेदवार विजय झाले आहेत. दहावी जागा कोणाला जाणार याबाबत सर्वांनाच उत्सूकता होती.
कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार विजयी
भाजप – राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे, प्रसाद लाड यांचा विजय
शिवसेना – सचिन अहिर, आमशा पाडवी यांचा विजय
राष्ट्रवादी – रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे यांचा विजय
काँग्रेस – भाई जगताप यांचा विजय
काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोर यांचा पराभव झाला आहे.
भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसच्या भाई जगताप, श्रीकांत हंडोरे यांच्यात कांटे की टक्कर सुरु होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा चमत्कार करुन दाखवला आणि प्रसाद लाड हे विजयी झाले. तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आणि चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले.
भाजपच्या उमेदवारांना एकूण 133 मते मिळालीआहेत अशी माहिती भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली. प्रवीण दरेकर यांना 29, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना प्रत्येकी 30 तर उमा खापरे यांना 28 मते मिळाली आहेत. प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची 17 मते मिळालीआहेत.
💠विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार जिंकले
💠राज्यसभेत १२३ मतं घेतली, आता १३४ मतं घेतली
💠मविआत नाराजी, समन्वय नाही, सरकारवर आमदारांचा विश्वास नाही
देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीची मते फुटली
आताच्या निकालानुसार महाविकास आघाडीची 21 मते फुटली आहेत. ही मते नेमकी कुणाची. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची 52 मते पडली, मग शिवसेनेची हक्काची 3 मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मते फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 मते मिळाली आहे.
महाराष्ट्रातील आमदारांचे संख्याबळ एकूण 285 आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला किमान 26 मतांच्या कोट्याची गरज होती. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने देखील कॉंग्रेस आपला एक उमेदवार विजयी करू शकली नाही, यावरून महाविकास आघाडी सरकारवर असलेली आमदारांची नाराजी, असंतोष दिसत असल्याची टीका भाजपने केली आहे.
भाजपच्या महिला आघाडीची तोफ विधानपरिषदेत, उमा खापरे पिंपरीच्या पहिल्या महिला आमदार
उमा खापरे या पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा भाजपच्या तिकीटावर नगरसेविका झाल्या आहेत. २००१-०२ या काळात त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेतेपदही भूषवलं आहे. उमा खापरे सध्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत.
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठावान सहकारी म्हणून उमा खापरे ओळखल्या जात. प्रदेश भाजप कार्यकारिणीत त्यांनी गेली २० वर्ष विविध पदांवर काम केलं आहे. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने खापरेंचे हात बुलंद केले आहेत. त्यांचा आवाज आता विधानपरिषदेत घुमताना दिसणार आहे.
निवडणुकीत २८५ आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्य विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी आज मुंबईत विधानभवनात २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली त्यामुळे या दोघांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तर, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे त्यांची जागाही रिक्त आहे. उर्वरित सगळ्या २८५ आमदारांनी मतदान केलं.
काँग्रेसची तक्रार
काँग्रेसनं लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या भाजपा आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतल्यांमुळे मतमोजणी सुरु होण्यास उशीर झाला. जगताप आणि टिळक यांनी मतदानासाठी सहाय्यकांची मदत घेतल्यानं निवडणूक नियमांचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसनं केली आहे. तर, हे दोन्ही आमदार आजारी असल्यानं नियमानुसार सहाय्यक घेण्याची परवानगी घेतली होती, त्यामुळे काँग्रेस वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com