Bilateral talks between Prime Minister Narendra Modi and German Chancellor Olaf Schulz
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्यांत द्विपक्षीय चर्चा
बर्लिन: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीची राजधानी बर्लिन इथं चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेऊन चर्चा केली. द्विपक्षीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्यांवर उभयतांमधे चर्चा झाली. जर्मन राष्ट्र प्रमुखांच्या कार्यालयात पारंपारिक लष्करी मानवंदना देऊन मोदी आणि त्यांच्या सोबतच्या शिष्टमंडळाचं स्वागत झालं. त्यापूर्वी बार्लिनमधे राहणारा भारतीय समुदाय उत्साहानं प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी जमला होता. विशेषतः मराठी समुदायानं ढोलताशा लेझीमच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत नृत्य करीत आनंद व्यक्त केला.
भारत-जर्मनी आंतरसरकारी मसलतीची सहावी द्वैवार्षिक बैठक मोदी आणि स्कोल्झ यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली झाली. यावेळी हरीत आणि शाश्वत ऊर्जा सामंजस्य करारावर सह्या झाल्या. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांमधल्या संबंधामधे प्रगती झाली असल्याचं मोदी यांनी सांगितलं. तर, भारत आणि जर्मनी यांच्यातले संबंध परस्पर विश्वासावर आधारित आहेत, असं स्कोल्झ यांनी सांगितलं.
चर्चेनंतर संयुक्त प्रेस स्टेटमेंटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाही म्हणून भारत आणि जर्मनीमध्ये समान मूल्ये आहेत. ते म्हणाले की, या सामायिक मूल्ये आणि समान हितसंबंधांवर आधारित भारत-जर्मनी द्विपक्षीय संबंधांनी गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. युक्रेनच्या संकटावर, श्री मोदी म्हणाले, भारताने सुरुवातीपासूनच युद्धविरामाचे आवाहन केले आहे कारण त्यांना विश्वास आहे की संवाद हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. ते म्हणाले, या संघर्षातून कोणताही पक्ष विजयी होऊ शकत नाही आणि त्यामुळे भारत शांततेचे समर्थन करतो. ते म्हणाले की, या युद्धाच्या मानवतावादी परिणामाबद्दल भारत खूप चिंतेत आहे.
युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली आणि चर्चेच्या मार्गानं लवकरात लवकर ह प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर प्रधानमंत्री भारत जर्मनी व्यावसायिक संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. या दौऱ्यामुळे भारत-जर्मनी परस्पर मैत्रीसंबंध दृढ होतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. जर्मनीनंतर मोदी डेन्मार्कला भेट देणार असून त्याकरता उद्या ते कोपनहेगनला रवाना होतील. दोऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री फ्रान्सला धावती भेट देणार असून, पॅरिस इथं फ्रान्सचे प्रधानमंत्री इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.
हडपसर न्यूज ब्युरो