BJP has nothing to do with the current political situation in the state – Chandrakant Patil
राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींशी भाजपाचा काहीही संबंध नाही – चंद्रकांत पाटील
कोल्हापुर : राज्यातल्या सध्याच्या राजकीय हालचालींशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला.
एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आलेला नाही मात्र तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करु असंही त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सतत कार्यकर्त्यांच्या कामासाठी दिल्लीला जात आहेत. शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल, असं पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
आपण कोणाच्याही संपर्कात नसून, राज्यातल्या घडामोडींविषयी आपल्याला दूरचित्रवाहिन्यांवरुनच माहिती मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत, कोण जाणार आहेत, कोण परत येणार आहेत याबाबत पत्रकारांना छेडलं असता आपल्याला काहीही माहित नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
मोहित कांबोज हे एकनाथ शिंदे यांचे मित्र असल्यानं त्यांच्यासोबत असतील, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी सांगितले की, भाजपाच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेते.
शिवसेनेच्या दोनतृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच ते मा. शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते मत व्यक्त करत असतात.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही. तथापि, अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, असे आपण यापूर्वी सातत्याने म्हणत होतो, याची त्यांनी पत्रकारांना आठवण करून दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com