One and a half thousand crore provision in the budget for the proposed internal-external ring road in Pune city – Prajakt Tanpure
पुणे शहरात प्रस्तावित अंतर्गत- बाह्य रिंगरोडसाठी, अर्थसंकल्पामध्ये दीड हजार कोटींची तरतूद – प्राजक्त तनपुरे
मुंबई : पुणे शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य रिंगरोड प्रस्तावित असून या अर्थसंकल्पामध्ये दीड हजार कोटी तरतूद केली आहे. या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून भूसंपादनाचे बरेचसे टप्पे पार पडले आहेत, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य ॲड. राहुल कुल, जयकुमार गोरे आदी सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच शहरांच्या बाहेरील ग्रोथ सेंटर्ससह एकूण २१७२ चौ. कि.मी. क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा अहवाल तयार करण्यात आला आहे.
याच सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसरच भविष्यातील सर्व वाहतूक योजनांची कामे करण्यात येणार आहे. पुण्याकडे जाताना शिक्रापूरपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या रहदारीचा विचार करुन फ्लायओव्हर घेण्यात येणार असून त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम सुरु आहे, ते तातडीने करण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.
शहरातून विमानतळाकडे जाणाऱ्यांना रिंगरोडची चांगली मदत होणार असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्वावर करण्यात येणार असून महिनाभरात निविदेचे काम होईल, असे सांगून पुणे-सिंहगड मार्गावरील पूलाच्या कामामुळे पर्यायी रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau