Call for online application for ‘Individual farm ponds’ component
‘वैयक्तिक शेततळे’ घटकासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान
महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडीची कार्यवाही
पुणे : मुख्यमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ‘वैयक्तिक शेत तळे’ ही बाब कार्यान्वित करण्यात आलेली असून याकरिता शेतकऱ्यांनी अर्ज करतांना ‘सिंचन साधने व सुविधा’ या टॅबअंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ या बाबीची निवड करावी.
त्यानंतर ‘इनलेट आणि आऊटलेटसह’ किंवा ‘इनलेट आणि आऊटलेट शिवाय’ यापैकी एका उपघटकाची निवड करावी. त्यानंतर ‘शेततळ्याचे आकारमान’ व ‘स्लोप’ ची निवड करावी. अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
‘वैयक्तिक शेततळे’ घटकासाठी पुणे जिल्ह्याला २०२२-२३ या वर्षासाठी ४ कोटी ८० लाख रूपये इतक्या रकमेचा लक्षांक देण्यात आलेला आहे.
या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी जवळच्या मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com