Health Minister calls for speeding up immunization of children
लहान मुलांच्या लसीकरणाची गती वाढवण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : कोरोना स्थिती बाबत राज्यात घाबरण्यासारखी स्थिती नाही असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मिझोराममध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आणि नवे रुग्ण आढळण्याच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या राज्यांना सावधानतेबाबत पत्रं लिहिली आहेत.
त्या पार्श्वभूमीवर टोपे बोलत होते. आपल्या राज्यानं दररोजच्या ४० ते ६० हजार केसेस पाहिल्या आहेत. त्यामुळे सध्याची स्थिती अजिबात घाबरण्यासारखी नाही याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
राज्यात १२ ते १५ आणि १५ ते १८ वर्षाच्या बालकांच्या लसीकरणाची मोहिम राबवली जात असून पालकांनी आपल्या मुलांच्या लसीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही ते म्हणाले. या कामी शाळांचीही मदत घेत आहोत असंही त्यांनी सांगितलं. सहव्याधी असलेल्या किंवा वृद्ध लोकांनी खाजगी दवाखान्यांमध्ये जाऊन वर्धक मात्रा घ्यावी असंही ते म्हणाले. आपण राज्यात सर्व निर्बंध हटवलेले आहेत. मास्कही आता अनिवार्य नाही. ज्यांना वाटेल त्यांनी तो धारण करावा असंही त्यांनी सांगितलं.