Campaign against Adulteration of Edible Oil till 14th August
१४ ऑगस्टपर्यंत खाद्यतेल भेसळ विरोधी मोहीम
पुणे : खाद्यतेल, वनस्पती तेल तसेच बहु-स्रोत खाद्यतेला संदर्भात पुणे विभागात येत्या १४ ऑगस्टपर्यंत खाद्यतेल भेसळ विरोधी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त ए.जी.भुजबळ यांनी दिली.
सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रतीचे खाद्यतेल मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विशेष मोहिमांच्या माध्यमातून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेमार्फत तपासणीसाठी घेते. त्याच धर्तीवर नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात खाद्यतेल, वनस्पती तेल तसेच बहु-स्रोत खाद्यतेलाच्या अनुषंगाने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.
३ ऑगस्टपासून ही मोहीम राबविण्यात येत असून १४ ऑगस्टपर्यंत स्थानिक व नामांकित मोठ्या नाममुद्रेचे (ब्रॅंड) नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण करण्यात येणार आहे. बहु-स्रोत खाद्यतेलाची विक्री ॲगमार्क परवान्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे याबाबत देखील तपासणी करण्यात येणार आहे. सुट्या खाद्यतेल विक्रीस प्रतिबंध असून सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कायद्यांतर्गत कारवाई देण्यात येणार आहे.
सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत ३ व ४ ऑगस्ट या कालावधीत पुणे विभागात खाद्यतेलाचे – ४६, वनस्पतीचे १ व बहु-स्रोत खाद्यतेलाचे ३ असे एकुण ५० सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सर्वेक्षण नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रेत्याकडून नियमित अन्न नमुने घेऊन कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही श्री. भुजबळ यांनी कळविले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com