Campaigning for the first phase of Gujarat elections is over
गुजरात निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातला प्रचार संपला
अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपला. पहिल्या टप्यात सौराष्ट्र,दक्षिण गुजरात आणि कच्छ मधल्या ८९ जागांसाठी एक डिसेंबरला मतदान होणार आहे.
यावेळी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी मध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहे. १९९५ पासून राज्यात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांना आकर्षित करतोय.
भाजप साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी , गृह मंत्री अमित शाह राज्यभर प्रचार सभा घेत आहेत. या शिवाय भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीही प्रचारात सहभागी झाले आहेत.
दुसरीकडे काँग्रेस पक्ष स्थानिक स्तरावर प्रचार करण्यावर भर देत आहे.
सुरत महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आम आदमी पार्टी राज्यात पाय रोवण्यासाठी रोड शोच्या माध्यमातून आक्रमक प्रचार करत आहे. प्रत्येक पक्ष तरुण मतदारांना आकर्षित करण्या साठी सामाजिक माध्यमांचा पण वापर करत आहेत.
पहिल्या टप्प्यात दोन कोटी पेक्षा जास्त मतदार ७८८ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करतील. दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी राज्यात जोरदार प्रचार चालू आहे.
दरम्यान, निवडणुकी दरम्यान शांतीपूर्ण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे. या वर्षी पहिल्यांदा पन्नास टक्क्याहून अधिक मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com