Campaigning for the first phase of the Gujarat Assembly elections will end today
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपणार
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी निवडणूक आयोगानं पूर्ण केली आहे.
सर्वच राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचारही तीव्र झाला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दाहोद आणि वडोदरा जिल्ह्यांमध्ये जाहीर सभांना संबोधित करत आहेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दाहोद, खेडा आणि अहमदाबाद जिल्ह्यात निवडणूक रॅलींना संबोधित करत आहेत.
या टप्प्यात १९ जिल्ह्यांतील ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.कच्छ, सुरेंद्रनगर, मोरबी, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोताड, नर्मदा, भरूच, सुरत, तापी, डांग्स, नवसारी आणि वलसाड या जिल्ह्यांमध्ये विधानसभा मतदान होणार आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, परसोत्तम रुपाला आणि मनसुख मांडविया यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेतेही आज राज्याच्या प्रचाराच्या वाटेवर आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पंचमहाल येथे रोड शो केला आणि लुनावाडा येथे सभेला संबोधित केले.
श्रीमती इराणी आज गांधीधाममध्ये एका महिला संमेलनाला संबोधित करणार आहेत आणि रोड शोचे नेतृत्व करणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा आज अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत तर प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्यासह पक्षाचे इतर नेते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत आहेत.
आम आदमी पक्षाकडून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्षासाठी मते मागण्यासाठी सौराष्ट्र भागातील लिमडी आणि बोटाड येथे रोड शो केले.
मुख्य लढत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यात आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com