Chief Minister appeals to rebel Shiv Sena MLAs to return
बंडखोर शिवसेना आमदारांना परत येण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : राज्यातलं राजकीय वातावरण अद्याप अनिश्चिततेच्या पातळीवरच आहे. शिवसेनेच्या दोन गटांमधून दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप चालू आहेत. त्याबरोबरच इतर राजकीय पक्षही सावध पवित्र्यात असून विविध नेत्यांच्या भेटीगाठी चर्चा यांना वेग आला आहे.
बंडखोर शिवसेना आमदारांनी गुवाहाटीतून परत यावं असं आवाहन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपण एकत्र बसून या पेचातून मार्ग काढू, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातला संभ्रम दूर करू असं त्यांनी आज सांगितलं.
या आमदारांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, शिवसेनेत त्यांना जो सन्मान मिळाला तो इतर कुठेही मिळणार नाही अशी भावनिक साद ठाकरे यांनी घातली. गुवाहाटीहून काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावर प्रतिक्रिया देताना, शिवसेना पक्षप्रमुखांचे पुत्र आणि पक्षप्रवक्ते बंडखोरांविषयी अर्वाच्च शब्द काढत आहेत, मात्र दुसरीकडे पक्षप्रमुख हिंदुविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी आमदारांना सोबत येण्याच आवाहन करत आहेत. याचा काय अर्थ घ्यायचा असा सवाल एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे केला आहे. दरम्यान, आपल्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावं ठाकरे यांनी जाहीर करावी असं शिंदे यांनी गुवाहाटी इथं प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितलं.
आपल्यासोबतचे आमदार राजीखुषीने आले असून कोणावरही जबरदस्ती झालेली ही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, काही आमदारांनी प्रसारमाध्यमांसमोर आपापली निवेदनं केली. दीपक केसरकर, उदय सामंत, आणि सदा सरवणकर, शहाजी पाटील यांनी आपापली बाजू सांगितली. आपण केवळ एकनाथ शिंदे यांच्याच संपर्कात असल्याचं सांगणाऱ्या या आमदारांच्या ध्वनिचित्रफिती प्रसिद्ध होत आहेत. उदय सामंत यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com