Chief Minister’s directive to implement Panchasutri in all districts in the state
राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नागपूर : जगातल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, यावेळी उपस्थित होते.
सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधावा, चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे निर्देश केंद्र शासनानं दिले आहेत.
त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करावी, असं निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यात कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगानं वाढताना आढळत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केलं. राज्यात सध्या २ हजार २१६ कोविड रुग्णालयं असून, १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचं यावेळी सांगण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com