Chinchwad MLA Laxman Jagtap passed away
चिंचवडचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन
पुणे: भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज संध्याकाळी पिंपळे गुरव इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
जगताप हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ते चिंचवड मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवड़ून आले होते. पिंपरी-चिंचवडचं महापौरपद त्यांनी भूषवलं होतं. १९८६ ते २००६ पर्यंतच्या निवडणुकांमधे ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;
“महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप जी यांच्या निधनाने दुःख झाले. जनकल्याणासाठी आणि पुणे आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली
“तडफदार नेतृत्व काळाने हिरावले”
“नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी-चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नांची जाण आणि माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझ्या पक्षाचेच नाही तर माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी – चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहोचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत”.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लढवय्या सहकारी गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
“आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे”, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले, “मितभाषी, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ‘चिंचवडचा ढाण्या वाघ’ असे त्यांचे वर्णन केले जायचे. गंभीर आजारातही विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकात मतदानाचे आपले लोकशाहीतले कर्तव्य पार पाडून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. ईश्वर त्यांना सद्गती देवो. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो”, असे श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com