Citizens above 18 years of age will get incremental doses at private vaccination centers from Sunday
१८ वर्षांवरच्या नागरिकांना रविवारपासून खासगी लसीकरण केंद्रात मिळणार वर्धक मात्रा
नवी दिल्ली : देशभरातल्या खाजगी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरच्या लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा द्यायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे.
येत्या रविवारी म्हणजेच १० एप्रिलपासून या लसीकरणाला सुरुवात होईल. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लाभार्थी, ज्यांनी लसीची दुसरी मात्रा घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, असे नागरिक वर्धक मात्रा घ्यायला पात्र असतील असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरु असलेला मोफत कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम तसाच सुरु राहील. या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना पहिली आणि दुसरी मात्रा, तर आरोग्य कर्मचारी, आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना वर्धक मात्रा, विनामूल्य दिली जाईल असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
आत्तापर्यंत देशभरातल्या १५ पेक्षा जास्त वयाच्या ९६ टक्के पात्र लाभार्थ्यांनी लसीची किमान एक तर ८३ टक्के लाभार्थ्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. १२ ते १४ वयोगटातल्या ४५ टक्के लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. देशात वर्धक मात्रा द्यायला सुरुवात झाल्यापासून २ कोटी ४० लाख पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.
Hadapsar News Bureau.