India’s role in finding a comprehensive solution to global problems – Dr S. Jaishankar
जागतिक समस्यांवर सर्वसमावेशक तोडगा काढण्याची भारताची भूमिका
– डॉ. एस. जयशंकर
एशिया इकॉनॉमिक डायलॉग परिषदेला परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात प्रारंभ
चीन बरोबरचे भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध हे मोठे आव्हान असून आत्मनिर्भर भारत हेच त्यावरील समाधानकारक उत्तर
पुणे : एशिया इकॉनॉमिक डायलॉगच्या 3 दिवसीय सातव्या परिषदेला आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ . एस . जयशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात प्रारंभ झाला. परराष्ट्र मंत्रालयाचा हा भू-अर्थशास्त्रावरील वार्षिक प्रमुख कार्यक्रम असून पुणे इंटर नॅशनल सेंटरच्या सहकार्याने त्याचे आयोजन करण्यात आले आहे . ‘आशिया आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था’ ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.
या परिषदेचे उद्घाटन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामगे शेरिंग आणि मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर यांच्यातील संवादातून झाले. या परिषदेचे निमंत्रक गौतम बंबवाले यांनी त्यांच्याशी विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर संवाद साधला .
सध्या संपूर्ण जगाला, कोरोनामुळे निर्माण झालेले आव्हान, रशिया युक्रेन संघर्ष आणि जागतिक हवामान बदल यांसारख्या प्रमुख समस्या भेडसावत असून जी 20 गटाचा अध्यक्ष या नात्याने या सर्व प्रश्नांवर एकत्रित आणि सर्वसमावेशक तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. जयशंकर यांनी यावेळी सांगितले
जी 20 गटाचे अध्यक्षपद ही भारताला जगासमोर स्वतःला सादर करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेच्या पातळीवर भारत सध्या जगात पाचव्या स्थानावर असून लवकरच तिसऱ्या स्थानावर पोहोचेल त्यामुळेच एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जागतिक पातळीवरील विविध समस्यांवर तोडगा काढण्याची भारताची भूमिका असल्याचे ते म्हणाले .
चीन बरोबरचे भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध हे मोठे आव्हान असून आत्मनिर्भर भारत हेच त्यावरील समाधानकारक उत्तर असल्याचे डॉ. जयशंकर यांनी स्पष्ट केले. गेल्या काही काळात जागतिक पातळीवर अनेक बदल झाले आहेत, अनेक मोठे प्रकल्प उभे राहत असून आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढीस लागले आहे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे डॉ. जयशंकर म्हणाले .
ब्राझील, अमेरिका , इंग्लंड , दक्षिण आफ्रिका , भूतान , मालदीव , सिंगापूर आणि मेक्सिकोसह विविध देशातील 44 हून अधिक वक्ते या परिषदेत सहभागी होत आहेत. पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी स्वागत केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com