Cooperation in setting up research dedicated educational campus – Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
संशोधन समर्पित शैक्षणिक परिसर उभारल्यास सहकार्य
– उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्यात संशोधनाला समर्पित शैक्षणिक परिसर उभारल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल; शैक्षणिक संस्थांनी संशोधनासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसीत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पुणे एज्युकेशन फोरमतर्फे ‘उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह-संधी आणि आव्हाने’ या विषयावर पोचा हॉल येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाला पद्म विभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, आमदार राहुल कुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, डॉ.अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी संशोधन आणि नावीन्यतेला चालना देणारे अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे. संशोधन आणि नावीन्यतेमुळे संपत्ती निर्माण होते आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. परदेशातून आयात होणारे तंत्रज्ञान आणि साधने आपल्या देशात तयार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व्यवसायाभिमुख, कौशल्य विकासावर आधारित आणि नवकल्पनांना चालना देणारे अभ्यासक्रम राबवावे लागतील.
शैक्षणिक संस्थांमधील ७० टक्के अभ्यासक्रम रोजगार आधारित आणि ३० टक्के विद्यार्थ्याला आवडीच्या विषयातील आनंद देणारे असावेत. पुणे विद्यापीठाने येत्या जूनपर्यंत विद्यार्थ्यांना विविध विषयाचे ज्ञान एकाचवेळी देणारे अभ्यासक्रम सुरू करावेत. यापुढील काळात बहुशाखीय आणि वैशिष्ठ्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.
इंग्रजी जगातली प्रमुख संवादभाषा असल्याने एक विषय म्हणून तिचा अभ्यास आवश्यक आहे, मात्र इतर विषयांचे ज्ञान मातृभाषेतून देणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके मराठीतून उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्यास विद्यार्थाला त्याचा आनंद घेता येईल आणि विषय जाणून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या चार समित्यांचे अहवाल प्राप्त झाले असून लवकरच त्याबाबतच्या अंमलबजावणीकडे शासन लक्ष देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ.माशेलकर म्हणाले, शिक्षण आणि संधी देशाचे भविष्य घडविण्यासाठी महत्वाचे आहे. शिक्षणाच्या अधिकारासोबत योग्य शिक्षण आणि शिक्षणाची योग्य पद्धत महत्वाची आहे.
ज्ञान आणि कौशल्य देण्यासोबत समावेशनाचा ध्यास महत्वाचा आहे. संशोधनाने नवे ज्ञान निर्माण होते आणि नावीन्यतेने आर्थिक सुबत्ता साधता येत असल्याने नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आला आहे.
नव्या पिढीचा बौद्धिक स्तर लक्षात घेऊन शिक्षक घडवावा लागणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर होण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन सर्वांनी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.देशपांडे म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित आहे. ज्ञानवान विद्यार्थी घडविताना शिक्षकाच्या ज्ञानाला वाटा उपलब्ध करून देणे, त्याच्या क्षमतेचा ज्ञानाधारीत व्यवस्थेसाठी उपयोग करणेही महत्वाचे आहे.
शाळा आणि महाविद्यालयात नवे संशोधन होईल याचे नियोजन करावे लागेल आणि संशोधनाच्या उपयोगीतेवर भर द्यावा लागेल. याचे नियोजन करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर स्वतंत्र समिती तयार करावी लागेल. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करावी लागणार आहे असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजाने ठरविल्यास नवे शैक्षणिक धोरण प्रभावीपणे अंमलात आणता येईल. यात शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागतील.
अभ्यासक्रमातील नवे बदल वेगाने करायचे असल्याने बहुशाखीय दृष्टिकोनावर विशेष भर द्यावा लागेल. समाज आणि देश घडविण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर सर्वांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात राजेश पांडे यांनी चर्चासत्राच्या आयोजनाबाबत माहिती दिली. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात सर्वांनी योगदान दिल्यास शासनाला धोरण चांगल्यारीतीने राबविता येईल, असे त्यांनी सांगितले.
चर्चासत्रात उपस्थित प्रतिनिधींनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने विविध मुद्दे मांडले. प्राध्यापकांचे प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक सुविधा, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, नॅक मूल्यांकन आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनात ‘ए++’ श्रेणी मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com