All the departments should work in coordination to make the Vijaystambha ceremony a success
विजयस्तंभ अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
– जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, मागील वेळचा विजयस्तंभ अभिवादन सोहळा कार्यक्रम सर्व विभागांनी अतिशय चांगल्या समन्वयाने आयोजित केला. यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था, वाहनतळाचा आराखडा बारकाईने तयार करावा. पोलीस विभागाने वाहतूकीचे नियोजन करण्यासह कायदा व सुव्यस्थेबाबत सर्व ती काळजी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
सोहळ्याच्या उत्तम आयोजनाच्या दृष्टीकोनातून विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. दीर्घकालीन आराखड्यानुसार काही जागा संपादित करायच्या असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव आणि आर्थिक तरतूद बार्टी व समाजकल्याण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास दिल्यास आवश्यक ती कार्यवाही गतीने करण्यात येईल. गतवेळी पीएमपीएमएलने सोहळ्यासाठी आवश्यक संख्येने नव्या बसेस दिल्या होत्या. यावर्षीही पुरेशा प्रमाणात नव्या बसेस पुरवण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य तपासणी, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरेत शौचालय उभारणी, स्वच्छतेसाठी घंटागाड्या, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विजयस्तंभाशेजारी नदी असल्यामुळे आपत्तीव्यवस्थापन विभागाकडून बोटीची व्यवस्था आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
श्री.गजभिये म्हणाले, यापूर्वीच्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे सर्व विभागांनी अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन केले. या कार्यक्रमासाठी शासनाकडून निधीची तरतूद असल्यामुळे सर्व विभागांनी आपली मागणी तात्काळ बार्टीकडे द्यावी. या परिसरात चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com