Research on copperplates reveals new aspects of Indian history
ताम्रपटांच्या संशोधनातून भारताच्या इतिहासातील नवीन पैलू उलगडतात- डॉ. श्रीनंद बापट
ताम्रपट म्हणजे काय?
पुणे : केवळ राजाने दिलेल्या दानाचे तपशीलच नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाचे अनेक पैलू भारतातील तामप्रटांच्या संशोधनातून उलगडतात, असे प्रतिपादन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे निबंधक व पुराभिलेखतज्ज्ञ डॉ. श्रीनंद बापट यांनी आज येथे केले. भांडारकर संस्थेच्या प. कृ. गोडे स्मृती व्याख्यानमालेचे चौदावे पुष्प डॉ. श्रीनंद बापट यांनी नुकतेच गुंफले. नामवंत पुराभिलेखतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास पाडिगार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
चालुक्य विजयादित्याच्या ताम्रपटासह एकूण चार ताम्रपटांचे सादरीकरण बापट यांनी दोन व्याख्यानांमधून केले. भांडारकर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. अमृता नातू यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बापट यांनी ताम्रपटांशी संबंधित विविध रंजक माहिती देखील दिली. त्यात ते म्हणाले की, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या तोच चंद्रमा नभात या अजरामर गीताचे प्रेरणास्थान असणारा यः कौमारहरः… हा संस्कृत श्लोेक शीलभट्टारिका या प्राचीन संस्कृत कवयित्रीचा आहे.
राजशेखरासारख्या संस्कृत काव्यशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथकारांनी शीलभट्टारिकेच्या काव्याचा गौरव केलेला आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामीचा चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याचा पणतू विजयादित्य याने दिलेल्या एका ताम्रपटामध्ये तिचा उल्लेख येतो.
शीलभट्टारिका ही सम्राट पुलकेशीची कन्या होती. तिचा विवाह म्हैसूरच्या गंग घराण्याचा राजपुत्र दडिग याच्याशी झाला होता. या दोघांचा पुत्र महेंद्रवर्मा याच्या शिफारसीवरून विजयादित्याने कर्नाटकाच्या विजयनगर जिल्ह्यातील चिगटेरी हे गाव विष्णुशर्मा या विद्वानाला दान दिले होते.
इ.स. 717 सालच्या फेब्रुवारी महिन्यात दिलेला हा ताम्रपट पुण्यातील अमित लोमटे यांच्या संग्रहात आहे. कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील मालखेडचे राष्ट्रकूट घराण्यातील राणी शीलमहादेवी ही शीलभट्टारिका असावी अशी आजवर असलेली समजूत या नव्या शोधामुळे मागे पडणार आहे.
आजच्या धाराशिव जिल्ह्यातील सारोळे आणि दाभे ही दोन गावे यादव सम्राट रामदेवराय याचा सरदार माधव नायक याने 2 फेब्रुवारी 1276 या दिवशीच्या ताम्रपटाद्वारे एकूण चाळीस विद्वानांना दान केलेली होती. या भागातील 84 गावांचे प्रशासकीय मुख्यालय तडवळे येथे होते. सारोळ्याच्या सीमांवर तेव्हा असणार्या बेंबळी, मेढसिंगे, वाघोली, सांजे, तुगाव, काजळे आणि चिखली या गावांचा उल्लेखही या ताम्रपटात आहे.
वाकाटक घराण्यातील राजा दुसरा प्रवरसेन याने आजच्या छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्याच्या पाटन तालुक्यातील खापरी हे गाव इ.स.च्या पाचव्या शतकात एका ताम्रपटाद्वारे दान दिलेले होते. पाटन (पट्टुम) हे तेव्हा त्या भागाचे प्रशासकीय ठाणे होते. खापरी गावाच्या भोवती असणार्या कचांदुर, बोडल आणि पंडार या गावांचा निर्देश चतुःसीमा म्हणून या ताम्रपटात केलेला आहे. या ताम्रपटाचा एकच पत्रा आजवर उपलब्ध झालेला आहे.
बापट यांनी सादर केलेला चौथा ताम्रपट राजस्थानातील नाडोल इथल्या चौहान घराण्यातील राजा गजसिंह याचा आहे. उदयपूर जिल्ह्यातील गोमती नदीच्या तीरावर वसलेले पडला हे गाव गजसिंहाने 19 डिसेंबर 1174 रोजी दान दिलेले होते. जोधपूरच्या उत्तरेला असणार्या मंडोर इथला पूर्वीचा प्रशासक वैजल्लदेव याच्या निधनानंतर अकराव्या दिवशी झालेल्या वृषोत्सर्ग या विधीच्या वेळचे हे दान आहे. दान घेणारा विद्वान गोविंद हा सामवेदाचा उपासक होता. हा ताम्रपट अमळनेर इथले संग्राहक संजय भास्कर विसपुते यांच्या संग्रहात आहे.
ताम्रपट म्हणजे काय?
विद्वानांना अथवा लढवय्या सेनापतींना वंशपरंपरागत सुरू राहणारी इनामं दिली जात असत. टिकाऊ आणि परवडणार्या अशा तांब्याच्या पत्र्यांवर ती कोरली जात असत. असे कोरीव पत्रे तांब्याच्या कडीत ओवून तिच्यावर राजाची मुद्रा ठोकली जात असे. इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतचे विविध राजांचे ताम्रपट आढळतात. भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक इतिहासाच्या संशोधनात त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com