It is clear that Corona challenge is not fully over
कोरोनाचे आव्हान पूर्णपणे संपलेले नाही.
पंतप्रधानांनी कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
नवी दिल्ली : कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना विरोधी लढाईत लसीकरण हेच महत्वपूर्ण कवच असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
देशातल्या काही भागात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्शवभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. इतर देशांच्या तुलनेत भारतानं कोविड परिस्थिती योग्य रित्या हाताळल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र, कोरोनाच संकट अजून टळलं नसल्यानं सर्वानी दक्ष राहण्याची सूचना त्यांनी केली.
कोरोना विरोधी लढाईत लसीकरणामुळे महत्वपूर्ण विजय मिळाला असल्याचं ते म्हणाले. आरोग्य मंत्रालयानं भौगोलिक आव्हानांनाचाही सामना करत लसीकरण सुरु ठेवल्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. केंद्रीय आरोग्य सचिवांनी यावेळी एक सादरीकरण केले.
यात जगातील अनेक देशांमध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल त्यांनी चर्चा केली, तसेच भारतातील काही राज्यांमधील रुग्णसंख्येच्या वाढीवर प्रकाश टाकला. राज्यांनी नियमितपणे माहितीवर लक्ष ठेवणे आणि अहवाल देणे, प्रभावी देखरेख , पायाभूत सुविधा अद्ययावत करणे आणि केंद्राने दिलेला निधी वापरणे या आवश्यकतेबद्दल त्यांनी सांगितले.
देशात सर्वत्र शाळा सुरु होत आसतनाच रुग्णांचा प्रमाण वाढत असल्यामुळे पालक चिंतीत आहेत. मात्र, ६ वर्षांवरच्या सर्व पात्र लहान बालकांचं लसीकरण लवकरच सुरु होतं असल्यानं त्यांनाही कवच लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महामारीच्या सुरुवातीपासून वेळेवर मार्गदर्शन आणि मदत केल्याबद्दल बैठकीला उपस्थित मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी योग्य वेळी ही आढावा बैठक बोलावली असल्याचे त्यांनी सांगितले. आपापल्या राज्यातील कोविडची स्थिती आणि लसीकरणाच्या आढाव्याची माहिती त्यांनी दिली.
आपल्या भाषणाच्या समारोपाआधी तमिळनाडूतील तंजावर येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करून मोदी यांनी या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र आणि राज्याच्या एकत्रित प्रयत्नांची पंतप्रधानांनी दखल घेतली. त्यांनी मुख्यमंत्री, अधिकारी आणि सर्व कोरोना योद्धा यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक केले. यावरून स्पष्ट होते की कोरोनाचे आव्हान पूर्णपणे संपलेले नाही. युरोपमधील अनेक देशांच्या बाबतीत स्पष्ट झाल्याप्रमाणे ओमायक्रॉन आणि त्याचे उपप्रकार समस्या निर्माण करू शकतात. अनेक देशांमध्ये उपप्रकारांमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे असे ते म्हणाले.
अनेक देशांपेक्षा परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करण्यास भारत सक्षम आहे. तरीही, गेल्या दोन आठवड्यांत, काही राज्यांमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता आपल्याला सावध राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
या सर्व बाबींकडे, आपल्या व्यापक लसीकरण मोहिमेच्या दृष्टिकोनातून बघायला हवे, असे त्यांनी सांगितले. देशातल्या प्रत्येक व्यक्तिपर्यंत लस पोहोचली आणि आज देशातल्या 96 टक्के प्रौढ लोकसंख्येचे किमान एका मात्रेचे लसीकरण झाले आहे, तसेच 15 वर्षे वयावरील 84 टक्के लोकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तज्ञांच्या मते, कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लस हे मोठे सुरक्षाकवच आहे, असे त्यांनी सांगितले.
“रोगाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पहिल्याच पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याला आमचे प्राधान्य असून पुढेही ते तसेच राहायला हवे. आपल्याला, टेस्ट, ट्रॅक, आणि ट्रीटचे धोरण पुढेही तेवढीच मेहनत आणि कुशलतेने राबवायचे आहे” असे त्यांनी सांगितले.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले आहे आणि राज्यांनाही कर कमी करण्याची विनंती केली आहे, असे त्यांनी सांगितले. काही राज्यांनी कर कमी केले परंतु काही राज्यांनी त्याचा लाभ लोकांना दिला नाही, त्यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जास्त आहेत. हा केवळ राज्यातील जनतेवर अन्यायच नाही तर शेजारील राज्यांचेही नुकसान आहे. ते म्हणाले की, कर्नाटक आणि गुजरातसारख्या राज्यांनी महसूल बुडत असतानाही लोकांच्या कल्याणासाठी कर कपात केली तर त्यांच्या शेजारच्या राज्यांनी कर कमी न करून महसूल मिळवला.
त्याचप्रमाणे, गेल्या नोव्हेंबरमध्ये अधिभार कमी करण्याची विनंती करण्यात आली होती परंतु महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड यासारख्या अनेक राज्यांनी काही कारणास्तव तसे केले नाही. केंद्रातील ४२ टक्के महसूल राज्य सरकारांना जातो असे सांगत पंतप्रधान म्हणाले. “मी सर्व राज्यांना या जागतिक संकटाच्या काळात सहकारी संघराज्याच्या भावनेने एक संघ म्हणून काम करण्याचे आवाहन करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
वाढत्या तापमानामुळे जंगले आणि इमारतींना आगी लागण्याच्या घटना वाढत आहेत, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यांनी रुग्णालयांचे विशेषत्वाने फायर सेफ्टी ऑडिट करण्यास सांगितले. हे आव्हान पेलण्यासाठी आपली व्यवस्था सर्वसमावेशक असली पाहिजे आणि आपला प्रतिसाद देण्याचा वेळ कमीत कमी असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हडपसर न्युज ब्युरो