Course opportunities at Savitribai Phule Pune University after the 12th standard
बारावीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यासक्रमाच्या संधी
पुणे : सध्या सर्वत्र प्रवेशाची लगबग दिसून येत आहे. बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून बारावीनंतर आता पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अनेकदा विज्ञान, वाणिज्य आणि कलेच्या पलीकडे
काहीतरी वेगळं करण्याची अनेकांची इच्छा असते परंतु नेमके अभ्यासक्रम काय आहेत याची माहिती अनेकांना नसते. म्हणूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बारावीनंतर कोणते पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम करता येतील याची माहिती देण्याचा प्रयत्न आहे.
विद्यापीठात बारावीनंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेअंतर्गत अनेक अभ्यासक्रम आहेत. त्यामध्ये इंटरडिसिप्लीनरी स्कूल ऑफ सायन्स अंतर्गत बी. एस्ससी ब्लेंडेड इन फिजिक्स, केमिस्ट्री, एनव्हारमेंटल सायन्स, अर्थ सायन्स हे अभ्यासक्रम आहेत.
यासाठी विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाशी करारही केला आहे. बायोटेक्नॉलॉजी विभागातून ५ वर्षाचा एकत्रित एमएससी बायोटेक्नॉलॉजी (आयबीबी विभाग) हा अभ्यासक्रम आहे.
तंत्रज्ञान क्षेत्राशी सबंधित ‘बीएस्सी इन थ्री डी अनिमेशन अँड व्हीएफएक्स’ हा पदवी अभ्यासक्रम व प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील आहे. ‘बीटेक इन एविएशन’ हा पदवी अभ्यासक्रम देखील विद्यापीठात आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रोडक्शन ग्राफिक डिझाईन, प्रोडक्शन युआय डिझाईन, प्रोफेशनल व्हिज्युअल ईफेक्ट आदींचा समावेश आहे.
वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेअंतर्गत ‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम आहे.
कला शाखेत बारावीनंतर एमए इन म्युजिक, डान्स, थिएटर हे ललित कला केंद्राचे पाच वर्षाचे एकत्रित अभ्यासक्रमही विद्यापीठात सुरू झाले आहे. उर्दू भाषेचा पदविका अभ्यासक्रम, पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज अंतर्गत पाच वर्षाच्या एकत्रित अभ्यासक्रमापासून ते पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमापर्यंत अनेक अभ्यासक्रम आहेत.
भाषा विभागांतर्गत फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, स्पॅनिश यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. ‘इंटरडिसिप्लीनरी स्कूल ऑफ आर्ट’ अंतर्गत ‘लिबरल आर्ट’ मध्ये बीए करणे शक्य आहे.
तर व्होकेशनल अभ्यासक्रमांतर्गत बीव्होक इन रिन्यूएबल एनर्जी स्किल, रिटेल मॅनेजेंट, मॅनिफॅक्चरिंग स्किल हे अभ्यासक्रम उलब्ध आहेत.
या व्यतिरिक्त ‘डिफेन्स अँड स्ट्राटेजिक स्टडीज’ अंतर्गत एमए आणि एमएस्सी इन ‘डिफेन्स अँड स्ट्राटेजिक स्टडीज’ यात पाच वर्षाचा एकत्रित अभ्यासक्रम आहे. तसेच ‘फिजिकल एज्युकेशन’ अंतर्गत ‘माउंटनरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स’ ही आहे. वूमन अँड जेंडर स्टडीज या विभागांतर्गत ‘जेंडर अँड कल्चर’ आणि ‘जेंडर अँड डेव्हलपमेंट’ हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील उलब्ध आहेत.
या सर्व अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती, त्यासाठीची प्रवेश परीक्षा, प्रवेश क्षमता, सबंधित विभाग आदींची माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेस्थळावर देण्यात आली आहे. सध्या विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून जुलै महिन्यात प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com