Dadasaheb Phalke Award 2020 announced to veteran actress Asha Parekh
२०२० या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर
नवी दिल्ली : ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना साल 2020 चा दादा साहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज केली. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
हा निर्णय घोषित करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले “दादासाहेब फाळके निवड समितीने आशा पारेख जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या आजीवन योगदानासाठी सन्मानित करण्याचा आणि पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे जाहीर करताना मला सन्मान वाटतो.” 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 30 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केला जाणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील,असे त्यांनी जाहीर केले .
आशा पारेख या ख्यातनाम चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती असून कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. एक बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केल्यावर त्यांनी दिल देके देखो या चित्रपटातून प्रमुख नायिका म्हणून पदार्पण केले आणि त्यानंतर 95हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या. त्यांनी कटी पतंग, तिसरी मंझील, लव्ह इन टोकियो, आया सावन झूम के, आन मिलो सजना, मेरा गाव मेरा देश यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे .
आशा पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 1998-2001 या काळात केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या प्रमुख म्हणून काम केले आहे. आशा भोसले, हेमा मालिनी, उदित नारायण यांच्यासह इतर मान्यवरांचा सहभाग असलेल्या समितीनं ही शिफारस केली आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याच्या आधीच्या प्राप्तकर्त्यांमध्ये अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (2020 साठी) विजेत्यांची घोषणा जुलैमध्ये करण्यात आली, ज्यामध्ये तामिळ चित्रपट ‘सूराराई पोत्रू’ आणि हिंदी चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ने सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या.
एअर डेक्कनचे संस्थापक जी.आर.गोपीनाथ यांच्या जीवनातील घटनांपासून प्रेरित असलेल्या सूरराई पोत्रूने पाच पुरस्कार पटकावले आहेत, तर मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनाचा मागोवा घेणाऱ्या तानाजीला तीन पुरस्कार मिळाले आहेत.
दोन्ही चित्रपटांचे प्रमुख कलाकार, अजय देवगण (तान्हाजी) आणि सुरिया (सूराराय पोत्रू) यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान शेअर केला. सूरराय पोत्रूच्या पुरस्कारांमध्ये अपर्णा बालमुरलीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचाही समावेश आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना”