Decentralization of education is the core of the national education policy: Chandrakant Patil
शिक्षणाचं विकेंद्रीकरण हाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुख्य गाभा : चंद्रकांत पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन
पुणे : विकेंद्रित प्रशासन, विकेंद्रित शिक्षण हाच राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा असून पुढील काळात अश्याच प्रकारे काम केले जाईल, असे म्हणत अहमदनगरला उपकेंद्र असण्यासोबतच स्वतंत्र विद्यापीठ देण्याचा मानस असल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन बाबुर्डी घुमट येथे करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, मी विद्यार्थीदशेत असताना अनेक विद्यापीठांच्या उपकेंद्रांची मागणी केली होती त्यातील अनेक आज पूर्ण होताना ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळतंय याचा आनंद आहे. ते पुढे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील कच्च्या मालाचे अंतिम उत्पादन कसे होईल याचे शिक्षण देणे, त्यानुसार अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देणे हे या नव्या शैक्षणिक धोरणात सांगितले आहे. पुढील काळात या धोरणाची अंमलबजावणी करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्याचे एक लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत असेच जवळपास दोनशे महाविद्यालये आहेत त्यामुळे या जिल्ह्यात स्वतंत्र विद्यापीठ व्हावे अशी इच्छा आहे. तर प्रत्येक जिल्ह्याला एक विद्यापीठ असावे असे माझे मत आहे. या उपकेंद्रामुळे प्रशासकीय कामांना वेग येईल व येथील विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ सोडविणे शक्य होईल.
यावेळी डॉ.संजीव सोनवणे म्हणाले, या उपकेंद्राच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्यासोबतच आम्ही इथला शैक्षणिक आराखडा देखील तयार केला आहे. कोणतेही पारंपरिक अभ्यासक्रम देण्यापेक्षा या जिल्ह्याची गरज ओळखून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम येथे सुरू करण्यात येतील. तर राजेश पांडे म्हणाले, विद्यापीठाने मागील पाच वर्षात जागतिक दर्जाचं क्रीडा संकुल, दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम व शैक्षणिक प्रगती केली आहे. हे उपकेंद्र केवळ इमारत राहता कामा नये तर विद्यापीठचे छोटे प्रतिबिंब व्हावे. उपस्थितांचे आभार डॉ.प्रफुल्ल पवार यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com